कल्याण शहरात प्रथमच हौशी नाट्य महोत्सव


 कल्याण ( शंकर जाधव )  सांस्कृतिक वारसा लाभलेल्या कल्याण शहरात  शिवाजी शिंदे ( राज्यनाट्यस्पर्धा समनव्ययक ) यांच्या संकल्पनेतून प्रथमच आचार्य अत्रे रंगमंदिर कल्याण येथे हौशी नाट्य महोत्सव संपन्न झाला. महोत्सवात कल्याण शहरातील सात नामवंत नाट्यसंस्थांनी सहभाग घेतला.
 

             उद्योजक स्व. जयकुमार पाठारे (फाउंडर ऑफ व्हीआयपी क्लोथिंग इंडस्ट्री) व स्व. शरदचंद्र माथव ओक यांच्या स्मरणार्थ या हौशी नाट्य महोत्सवाचे आयोजन नाट्य परिषद मध्यवर्तीचे नियामक मंडळ सदस्य व नाट्य परिषद कल्याण शाखेचे अध्यक्ष शिवाजी शिंदे यांनी केले होते. १५ फेब्रुवारी ते १८ फेब्रुवारी या कालावधीत कल्याणच्या सात नामवंत हौशी नाट्य संस्थांनी यात सहभाग घेतला होता.

         
           या सातही नाट्य संस्थांचे नाट्यप्रयोग २१ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेत होणार आहेत. महोत्सवाच्या उदघाटन प्रसंगी लेखक दिग्दर्शक आनंद म्हसवेकर व नाट्य सिने अभिनेत्री ज्योती निसळ हे प्रमुख अतिथी लाभले होते.  विश्वनाथ भोईर, शिवसेना आमदार कल्याण प. तसेच महाराष्ट्र राज्य माथाडी आणि जनरल कामगार सेना ठाणे जिल्ह्याचे संयुक्त सरचिटणीस नारायण पाटील, चिटणीस दिलीप सावंत व चिटणीस  विजेंद्र चौधरी यांचे सौजन्य या महोत्सवास लाभले.  


            विजय (बंड्या) साळवी, प्रफुल्लशेठ गवळी, सुनील पाठारे व सुनिता अरविंद वैद्य यांचे विशेष सहकार्य या महोत्सवास लाभले. सृजन प्रतिष्ठान वाशिंद, कल्याण तालुका शिक्षण सामाजिक शैक्षणिक संस्था, भारतीय मानव विकास संघ सामाजिक शैक्षणिक संस्था, अनुराग कल्याण, नवांकुर संस्कार मंच, ज्ञानमैत्री  सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे सुबोध चित्र, एम्पिरिकल फाउंडेशन या संस्थांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता.             महाराष्ट्र शासनाच्या राज्य नाट्य स्पर्धेपूर्वी पूर्व तयारीकरीता नाट्य संस्थांना आचार्य अत्रे रंगमंदिरात नाट्यप्रयोग सादर करण्याची संधी दिल्याबद्दल नाट्यवर्तुळात श्री. शिवाजी शिंदे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. समारोप समारंभात ज्येष्ठ रंगकर्मी मेघन गुप्ते यांनी सहभागी संस्थांच्या वतीने श्री. शिवाजी शिंदे यांचे आभार मानत गेल्या साठ वर्षाच्या माझ्या कारकिर्दीत प्रथमच कल्याण शहरात असा नाट्य महोत्सव साजरा होत असल्याचे सांगितले. 


            कार्यक्रमाच्या समारोप समारंभात सांस्कृतिक संचालनालय कार्यक्रम अधिकारी सौ. अलका घोडके तसेच सुरेश पवार, मंगेश नेहरे, रविंद्र सावंत, स्वप्नील भिसेकर, सतीश देसाई असे  सिने-नाट्य क्षेत्रातील मान्यवर व्यासपीठावर होते. सुजाता कांबळे डांगे, ऐश्वर्या भारगुडे, करुणा कातखडे, हेमंत यादगिरे, स्वप्निल चांदेकर, सुरेश शिर्के, संजय गावडे, विशाल पितळे व अत्रे रंगमंदिर व्यवस्थापन यांनी कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास सोनवणे यांनी केले.

Post a Comment

0 Comments