पालकमंत्री एकनाथ शिंदे हे कल्याण डोंबिवलीचे तारणहार रविंद्र चव्हाणांचे आरोप नैराश्यातून - शिवसेनेचे प्रतित्युत्तर

एकाच मंचावर येऊन चर्चा करण्याचे शिवसेनेचे आमदार चव्हाणांना खुले आव्हान...

कल्याण : राज्याचे नगरविकास मंत्री तसेच ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून  कल्याण डोंबिवलीत 1 हजार 690 कोटींपेक्षा अधिक निधीचे विकास प्रकल्प सुरू आहेत. 


         त्यामुळे पालकमंत्री आणि खासदार हेच खऱ्या अर्थाने कल्याण डोंबिवलीच्या विकासाचे तारणहार असून भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी वैफल्यग्रस्ततेतून त्यांच्यावर ते आरोप केल्याचे प्रतित्युत्तर शिवसेनेने दिले आहे. यावेळी शिवसेना शहर प्रमुख राजेश मोरे, जेष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे, दीपेश म्हात्रे, उपजिल्हा प्रमुख राजेश कदम, तात्या माने आदी पदाधिकारी उपस्थित होते.


         भाजप आमदार रविंद्र चव्हाण यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले. त्याच्या प्रत्युत्तरादाखल डोंबिवली शहर शिवसेनेतर्फे आज पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप खोडून काढत भाजप आमदार चव्हाण यांच्यावर जोरदार टिका केली. तसेच विकासकामांबाबत चर्चा करण्यासाठी आमदार रविंद्र चव्हाण यांनी शिवसेनेसोबत एकाच मंचावर येण्याचे खुले आवाहनही शिवसेनेकडून करण्यात आले. 


           पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नातून कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात गेल्या 2 वर्षांमध्ये सुमारे 1 हजार 700 कोटींचे प्रकल्प मंजूर केले आहेत. मग तो बाह्य वळण रस्ता असो, विविध उड्डाणपूल असो, रस्त्यांचे काँक्रीटीकरण असो की भुयारी मार्ग आदी प्रकल्पांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे शिवसेनेतर्फे यावेळी सांगण्यात आले.
 

        तर 13 वर्षे आमदारकी भोगणाऱ्या आणि 3 वर्षे राज्यमंत्रीपद उपभोगलेल्या व्यक्तीला प्रशासकीय बाबी समजत नसतील तर यापेक्षा दुर्दैवाची बाब कोणती असा सवाल यावेळी माजी स्थायी समिती सभापती दिपेश म्हात्रे यांनी उपस्थित केला. 


        तसेच देवेंद्र फडणवीस सरकारच्या शेवटच्या काळात आमदार चव्हाणांना डोंबिवलीच्या विकासाची आठवण झाली आणि 471 कोटींच्या रस्त्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल प्रस्ताव तयार केला. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी त्याला प्रशासकीय आणि वित्तीय मंजुरी न दिल्याने त्याच्या निविदा निघाल्या नाहीत आणि ज्याच्या निविदा नाहीत त्या कामाचे कार्यादेश दिले जात नाही ही साधी तांत्रिक बाब आमदार चव्हाणांना समजत नसल्यास त्यांनी अभ्यास करावा असा खोचक सल्ला दिपेश म्हात्रे यांनी दिला. 


      तर त्यांनी कोणत्याही कार्यक्रमात आमच्यासमोर येऊन विकासकामांची चर्चा करण्याचे खुले आवाहनही म्हात्रे यांनी यावेळी दिले.

Post a Comment

0 Comments