उल्हास नदी अखेर जलपर्णी मुक्त

■जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी केली उल्हास नदीची पाहणी मी कल्याणकार सामाजिक संस्थेच्या लढ्याला यश...


कल्याण : उल्हास नदी अखेर जलपर्णी मुक्त झाली असून जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी आज उल्हास नदीची पाहणी केली. मी कल्याणकार सामाजिक संस्थेच्या 18 दिवस - रात्र उल्हास नदीपात्रात चाललेल्या आंदोलन, लढ्याला यश मिळाले आहे. उल्हास नदी जलपर्णी मुक्त व्हावी व  उल्हास नदीपात्रात कुठलीही प्रक्रिया न करता सोडण्यात येणारे सांडपाण्याचे ३ नाले तातडीने बंद करावे या दोन प्रमुख मागण्यांपैकी १ मागणी आज पूर्ण झाली असल्याची माहिती मी कल्याणकर संस्थेचे अध्यक्ष माजी नगरसेवक नितीन निकम यांनी दिली.


 
         आज ठाणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर व कल्याणचे तहसीलदार  देशमुख यांनी जलपर्णीमुक्त उल्हास नदीचा पाहणी दौरा केला. त्यावेळी त्यांनी हा यशस्वी प्रयोग करण्यात आला याबद्दल समाधान व्यक्त केले व लवकरच तीनही सांडपाण्याचे नाले बंद करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. तसेच लवकरच पालकमंत्री देखील उल्हास नदीचा पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले.


            उल्हास नदी जलपर्णी मुक्त व्हावी या करिता सगुणा रूरल फाउंडेशनचे चंद्रशेखर भडसावळे व त्यांच्या टीमने ड्रोन ने ग्लायफोसेट या केमिकलची फवारणी करून संपूर्ण नदी जलपर्णीमुळे मुक्त केली  व यापुढेही जलपर्णी पुन्हा येणार नाही याचीही काळजी घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. आज जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी बोटीत बसून उल्हास नदीची पाहणी केली व ड्रोनद्वारे फवारणी कशी केली याचे प्रात्यक्षिक ही बघितले.


           ज्या प्रकारे आज उल्हास नदी जलपर्णीमुक्त झाली त्याच प्रकारे लवकरच उल्हास नदी सांडपाणीमुक्त होईल असा विश्वास नितीन निकम यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments