कल्याण : शिवसेनेचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री सुधीर जोशी यांच्या निधनामुळे कल्याण मधील विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याहस्ते साधेपणाने करण्यात आले.
कल्याण मधील दुर्गाडी येथील पुलाचे, केडीएमसीच्या नुतनीकरण केलेल्या सभागृहाचे, कल्याण पूर्वेतील डायलेसिस केंद्राचे लोकार्पण तर कल्याणात नौदल संग्रहालय विकसित करण्याच्या कामाचे भुमिपुजन यावेळी करण्यात आले. यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात केंद्राचा उल्लेख न केल्याने केंद्रीय पंचायतराज मंत्री कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली.
यावेळी नगरविकास, सार्वजनिक बांधकाममंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज कपिल पाटील, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार विश्वनाथ भोईर, गणपत गायकवाड, रविंद्र फाटक, युवा सेनेचे पदाधिकारी वरूण सरदेसाई, एमएमआरडीएचे संचालक, पालिका आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्थित होते.
कल्याण शहरात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एमएमआरडीएच्या माध्यमातून दुर्गाडी किल्ल्याजवळ उल्हास खाडीवर सहा पदरी पूल बांधण्यात आला असून यातील दोन मार्गिकांचे याआधी लोकार्पण करण्यात आले होते. तर उर्वरित चार मार्गिकांचे आज लोकार्पण करण्यात आले. या पुलामुळे भिवंडी कल्याण रस्त्यावरील वाहतूक कोंडी व प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र हे उल्हास नदी किनाऱ्यावर वसलेले असून या शहरास लाभलेला ऐतिहासिक वारसा सांगणारा प्राचीन दुर्गाडी किल्ला हे या शहराचे प्रतिक आहे. दुर्गाडी किल्ल्या लगतच्या किनाऱ्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या आरमाराची नौका बांधणीची मुहूर्तमेढ रोवली होती.
सदर किना-याचे ऐतिहासिक महत्त्व जपण्याच्या दृष्टिकोनातून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून स्मार्ट सिटी अभियानांतर्गत नदीकिनारा व नेव्हल गॅलरी विकसित करण्याचा प्रकल्प स्मार्ट कल्याण-डोंबिवली डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड मार्फत हाती घेण्यात आला आहे.
समुद्र किनाऱ्याचे रक्षण करणाऱ्या बलाढ्य भारतीय नौसेनेचा अति विशाल माहितीपट तसेच 2.5 कि.मी किनारा सुशोभीकरण, दुर्गाडी किल्ल्या लगत बगीचा विकसित करणे, पायवाट व सायकल ट्रॅक बनविणे, लहान मुलांसाठी प्ले एरिया, व्याख्यान एरिया तयार करणे इत्यादी सुविधांमुळे कल्याण शहराचा नदीकिनारा विकसित होऊन नागरिकांना मॉर्निंग तसेच इव्हिनिंग वॉक करिता पर्याय उपलब्ध होणार आहे.
तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर सभागृहाचे नुतनीकरण करण्यात आले असून सभागृहामध्ये एकूण १४५ महापालिका सदस्यांसाठी आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रेक्षक गॅलरी, पत्रकार गॅलरी व महत्वाच्या व्यक्तीसाठी व्ही.आय.पी. कक्ष अशी सुसज्ज आसन व्यवस्था तयार करण्यात आली आहे.
यावेळी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यक्रमांची माहिती देतांना केंद्राचा उल्लेख न केल्याने केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. स्मार्ट सिटीतील विकासकामांमध्ये केंद्राचा अर्धा निधी असल्याने केंद्राचा देखील उल्लेख करणे आवश्यक होते असे मत यावेळी कपिल पाटील यांनी व्यक्त केली.
कल्याण पूर्व परिसरात प्रभाग क्र. १०० तिसगाव गावठाण मध्ये डायलिसिस सेंटर तयार करण्यात आले आहे. या डायलिसिस सेंटर मध्ये १० बेड्स, नर्सेस रूम, नर्सेस चेंजिंग रूम, फार्मसी रूम, स्वागत कक्ष, डायलिसिस वॉशिंग एरिया, स्वच्छतागृह, R.O प्लांट व संपूर्ण वातानुकूलित डायलिसिस हॉलची सुविधा निर्माण करण्यात आले आहे. सदर काम अवघ्या तीन महिन्यात पूर्ण करण्यात आले आहे.
0 Comments