कल्याण ( शंकर जाधव ) कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा घेण्यात आला.या मेळाव्यास गृह निर्माण जितेंद्र आव्हाड आले होते. यावेळी माजी अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेतली. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाली आहे.
पाटील यांनी ते पाच सहा नगरसेवकांना घेऊन राष्ट्रवादी प्रवेश करणार असल्याचे भेटी दरम्यान सांगितले. 2015 साली पाटील हे अपक्ष नगरसेवक पदी आडीवली ढोकळी प्रभागातून निवडून आले होते. त्यावेळी त्यांनी भाजपला समर्थन केले होते. आढावा बैठकीत पाटील यांनी आव्हाड यांची भेट घेतल्याने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आहे.
निवडणूकीच्या तोंडावर आणखी किती नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत असा प्रश्न आव्हाड यांना विचारले असता म्हणाले, कोण आमच्या संपर्कात आहे हे मीडियाला आधीच सांगितले तर आमचे राजकारण संपुष्टात येईल. त्यामुळे वेळ आल्यावर आमच्याकडे कोण येणार हे लवकर समजणार आहे.
निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेने आधीच मिशन लोटसला धक्का देत आत्तार्पयत चार नगरसेवक भाजपचे फोडले आहे. 2015 साली राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकाना पुन्हा पक्षात घेण्याचा राष्ट्रवादीचा राजकीय खेळ सुरु झाला आहे. त्यामुळे शिवसेनेत गेलेले नगरसेवक पुन्हा राष्ट्रवादीत येणार का याविषयी चर्चा सुरु झाली आहे.
शिवसेना मिशन लोटसला डॅमेज करीत आहे तर आव्हाड हे शिवसेनेच्या नगरसेवकांना राष्ट्रवादीत खेचण्याचे काम करीत आहेत. ठाण्यात आव्हाड विरुद्ध शिंदे असे राजकारण विविध मुद्यावरुन रंगलेले असताना आत्ता कल्याण डोंबिवलीतही शिवसेनेच्या पाठोपाठ आव्हाड यांनी मिशन कल्याण डोंबिवलीत राष्ट्रवादी मजबूत करण्यास सुरुवात केली आहे.
0 Comments