मणीपूर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास भाजपला पाठिंबा देणार - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

 

■मणीपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्ष खाते उघडणार


मणीपूर, 17-  मणीपूर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिक पक्षाचे 9 उमेदवार निवडणूक रिंगणात असून यंदा रिपब्लिकन पक्ष मणीपूर विधानसभेत निश्चित खाते उघडणार आहे. रिपब्लिकन पक्षाचे जे उमेदवार निवडून येतील ते सर्व भाजपला पाठिंबा देतील. येथील केसोथाँग या विधानसभा मतदार संघातील रिपाइंचे उमेदवार महेश्वर थाऊनाऊजाम यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले. 


       मणीपूर विधानसभा निवडणुकीतील रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ना.रामदास आठवले तीन दिवसांच्या मणीपूर दौर्‍यावर आले आहेत. आज केसोथाँग विधानसभा मतदार संघात रिपब्लिकन पक्षाची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली. त्या रॅलीचे भव्य प्रचारसभेत रूपांतर झाले. यावेळी केसोथाँग मतदार संघाचे उमेदवार महेश्वर थाऊनाऊजाम यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन ना.रामदास आठवले यांनी यावेळी केले. 


        महेश्वर थाऊनाऊजाम हे मणीपुरी चित्रपट सृष्टीचे सुप्रसिध्द अभिनेते आणि दिग्दर्शक आहेत. रिपब्लिकन पक्षाचे राज्य अध्यक्ष आहेत. त्यांनी गतवर्षी कोरोनाच्या कठीण काळात स्थानिक जनतेला मोठी मदत केली होती. गरीब जनतेला मोफत अन्नधान्य, औषधे, सॅनिटायझर, मास्क आदींचे मोफत वाटप केले आहे. त्यामुळे स्थानिक जनता रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार महेश्वर थाऊनाऊजाम यांच्या पाठीशी उभी आहे.


        त्यामुळे या निवडणुकीत मणीपूर विधानसभेत महेश्वर थाऊनाऊजामच्या रूपाने रिपब्लिकन पक्षाचा आमदार निवडून येईल आणि मणीपूर विधानसभेत रिपब्लिकन पक्षाचे खाते उघडले जाईल, असा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला. यावेळी रिपब्लिकन पक्षाचा ध्वजारोहण सोहळा आयोजित करण्यात आला. त्यावेळी मणीपूर जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रतिसाद दिला.


         यावेळी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष कृष्णमिलन शुक्ला, ईशान्य भारत प्रभारी विनोद निकाळजे, रिपाइं सचिव आस्मा बेगम, कृष्णा अय्यर असे अनेक मान्यवर उपस्थित होते. 


         मणीपूरच्या विधानसभेच्या एकूण 60 जागा असून त्यापैकी दोन जागांची मागणी रिपब्लिकन पक्षाने भाजपकडे केली होती. मात्र भाजपने जागा सोडण्यास नकार दिल्यामुळे रिपब्लिकन पक्षाने 9 उमेदवार स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. अन्य 51 जागांवर रिपब्लिकन पक्षाचा भाजपला पाठिंबा राहणार आहे. 


       तसेच रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास मणीपूरमध्ये सरकार स्थापन करण्यास भाजपला रिपाइं चे आमदार  पाठिंबा देतील, अशी घोषणा यावेळी ना. रामदास आठवले यांनी केली. त्यानंतर खुंद्राकपम या मतदारसंघात श्री एलनगबम सोविड सिंग आणि आईनम या मतदारसंघात श्री लैटोनजम ब्रोजन सिंग या रिपाइंच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी  ना. रामदास आठवले यांनी जाहिर सभांना संबोधित केले. 


          महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन पक्ष आणि निळा झेंडा मणीपुरी जनतेने मनापासून स्वीकारला आहे. त्यामुळे मणीपूरमध्ये अनेक ठिकाणी रिपब्लिकन पक्षाच्या ध्वजारोहणात आणि रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी स्थानिक मणीपूर जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभत आहे. त्यामुळे यंदा मणीपूर विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचा निळा झेंडा नक्कीच फडकणार असल्याचा विश्वास ना. रामदास आठवले यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

0 Comments