संघर्ष करू, पण मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवू! - महापौर नरेश म्हस्के

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा, यासाठी ठाम निग्रह व्यक्त / कोमसापकडून राष्ट्रपतींना लिहिलेली 15 हजार पोस्टकार्डे डाक विभागाकडे सुपूर्द


ठाणे : आपली मराठी भाषा समृद्ध असतानाही, तिला अभिजात दर्जा द्या म्हणून मागणी करावी लागते आहे, ही खेदाची बाब आहे. महाराष्ट्राला तसेही संघर्षाशिवाय काही मिळालेले नाही. त्यामुळे अभिजात भाषेचा दर्जाही आपण संघर्ष करून मिळवू, असा ठाम निग्रह ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी व्यक्त केला. 


        कोकण मराठी साहित्य परिषदेकडून राष्ट्रपतींचे लक्ष मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा या मागणीकडे वेधण्यासाठी 15 हजार पोस्टकार्डे शुक्रवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल येथे झालेल्या एका विशेष कार्यक्रमात डाक विभागाकडे सुपूर्द करण्यात आली. त्यावेळी नरेश म्हस्के यांनी मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भात होत असलेल्या चालढकलीवर भाष्य केले.   


       कोकण मराठी साहित्य परिषदेकडून (कोमसाप) एप्रिल महिन्यात राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन होणार आहे. त्या निमित्ताने, मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिला जावा या मागणीकडे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे लक्ष वेधण्यासाठी कोमसापकडून त्यांना तब्बल 75 हजार पत्रे पाठविली जाणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या पत्रमोहिमेतील 15 हजार पत्रांचा पहिला बटवडा शुक्रवारी ठाण्यातील आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयात झालेल्या कार्यक्रमात डाक विभागाचे सहाय्यक अधिक्षक आय. पी. सिंग यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.


        मराठी भाषा गौरव दिनाच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या कार्यक्रमास ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांच्यासह, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) बाळासाहेब पाटील तसेच कोमसापचे पदाधिकारी उपस्थित होते. 


      यावेळी महापौर नरेश म्हस्के म्हणाले की, इतर भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे, मग आपल्या मराठी भाषेला तो का मिळू नये, अशी बहुसंख्य मराठीजनांची भावना आहे. कोमसापच्या पत्रमोहिमेला नागरिकांचा मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हेच दाखवून देत आहे. त्यामुळे मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू, अशी भूमिका महापौर म्हस्के यांनी मांडली.


        तर मराठी भाषा अभिजात व्हावी असे वाटणाऱ्यांची संख्या मोठी आहे ही आनंदाची बाब आहे. परंतु अनेक मराठी कुटुंबांमध्ये मराठी बोलता न येणारी पिढी उदयास आली आहे. हे असेच चालत राहिले, तर येत्या काळात चांगले मराठी बोलू शकणारी व्यक्ती शोधत बसावी लागेल. तेव्हा पाश्चात्त्य देशांनी शिक्षणापासून सर्वच क्षेत्रांत आपापल्या भाषांना ज्याप्रकारे अभिमानाने जपले आहे, त्याच वाटेने आपणही जायला हवे, असे प्रतिपादन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले. 


       यावेळी हाच धागा पकडून ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनीही मराठी भाषेच्या संवर्धनाची गरज व्यक्त केली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा लवकरच मिळेल असे संकेत मिळताहेत, असा आशावाद मांडत जिल्हाधिकारी नार्वेकर म्हणाले की, मराठीला अभिजात दर्जा मिळेलही, पण बदलत्या तंत्रज्ञानासमोर मराठीचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आपल्यासमोर आहे. मराठीतून तंत्रस्नेही शिक्षण, कौशल्ये रुजवता येतील यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.


       तंत्रज्ञानाच्या आघातामुळे आणि इंग्रजीच्या प्रभावामुळे मराठी शब्द वापरातून निसटताहेत याची आठवण जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी यावेळी करून दिली. मराठी शब्दांना इंग्रजीतील लघुप्रतिरूप वापरण्याची युगत आली असून यात मोठ्या गोष्टी छोट्या आणि खऱ्या गोष्टी खोट्या ठरू लागल्या आहेत, अशी मिश्किल टिप्पणीदेखील त्यांनी केली.      


        कोमसाप मराठी भाषेच्या प्रसार व विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहे. आपल्या मराठी अस्मितेचा विसर आजच्या पिढीला पडू नये, यासाठीही कोमसाप विविध उपक्रम राबवत असून अभिजात भाषेच्या मागणीसाठीची पत्रमोहीम त्याचाच एक भाग आहे. विविध महाविद्यालयांतील विद्यार्थीदेखील या मोहिमेत सक्रीयपणे सहभागी होत असून 75 हजार पत्रांचे लक्ष पूर्ण होईपर्यंत कोमसाप ही पत्रमोहीम सुरूच ठेवेल, असे प्रतिपादन यावेळी कोमसापचे केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले. 


        कार्यक्रमास शारदा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विलास ठुसे, आनंद विश्व गुरुकुल महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. हर्षला लिखिते, ज्ञानसाधना महाविद्यालयाचे विश्वस्त कमलेश प्रधान, कोमसापचे ठाणे जिल्हाध्यक्ष बाळा कांदळकर आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे श्रवणीय सूत्रसंचालन कोमसापच्या युवाशक्ती प्रमुख प्रा. दीपा ठाणेकर यांनी केले.

Post a Comment

0 Comments