युनायटेड वे मुंबईतर्फे मुंबईच्या डबेवाल्यांना आवश्यक वस्तूंच्या १२७० किट्सचे वाटपमुंबई, २७ फेब्रुवारी २०२२ : युनायटेड वे मुंबई या विनानफा तत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या, शहरी आणि ग्रामीण समुदायांसाठी काम करणाऱ्या संघटनेने  मुंबईच्या डबेवाल्यांना आवश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप केले.  कोविड-१९ काळातील गरजा ओळखून त्या पूर्ण करण्यासाठी संघटनेने हाती घेतलेल्या या उपक्रमांतर्गत रविवार २७ फेब्रुवारी २०२२ रोजी दादर, मालाड, नालासोपारा, उल्हासनगर आणि मुलुंड या ५ ठिकाणी मुंबईच्या डबेवाल्यांना आवश्यक वस्तूंच्या किट्सचे वाटप करण्यात आले.


       एचएसबीसी बँकेच्या सहयोगाने युनायटेड वे मुंबई ही स्वयंसेवी संस्था दर महिन्याला आवश्यक वस्तूंच्या १२७० किट्सचे वाटप करत आहे. गेले सात महिने हा उपक्रम राबवला जात आहे. ३५ किलो वजनाच्या प्रत्येक किटमध्ये ५ जणांच्या एका कुटुंबाला पुरतील इतके तांदूळ, कडधान्ये, तेल, स्वच्छता प्रसाधने यांचा समावेश आहे. ही स्वयंसेवी संस्था मुंबईच्या डबेवाल्यांसाठी गेले वर्षभर काम करत आहे. 


      याअंतर्गत त्यांनी रेशन किट्सचे वाटप करण्याच्या बरोबरीनेच जेवणाचे डबे पोहोचवण्यासाठी नवीन सायकली, या समुदायातील प्रत्येक सदस्यासाठी ५ लाख रुपयांचे आरोग्य विमा संरक्षण, जेवणाचे डबे पोहोचवण्याचे काम अधिक कार्यक्षमतेने पार पडावे यासाठी स्मार्टफोन्स, त्यांच्या मुलांना घरून अभ्यास सुरु ठेवता यावा यासाठी टॅबलेट्स तसेच शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा शाळेत जाता यावे यासाठी स्टेशनरी किट्स असे वेगवेगळ्या प्रकारचे साहाय्य पुरवण्यात आले आहे. 


        युनायटेड वे मुंबईचे कम्युनिटी इन्व्हेस्टमेंटचे उपाध्यक्ष श्री. अनिल परमार यांनी सांगितले, "मुंबईचे डबेवाले हा मुंबईच्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. सन १८०० च्या शेवटी सुरु करण्यात आलेल्या त्यांच्या या कामाने लाखो मुंबईकरांना घरी बनवलेल्या जेवणाचे डबे रोजच्या रोज पोहोचवले जातात.  


        पूर, दंगली, दहशतवादी हल्ले असे कोणतेही संकट मुंबईच्या डबेवाल्यांना थांबवू शकलेले नाही. पण आता त्यांचे ग्राहक गेली दोन वर्षे घरून कामे करत आहेत आणि त्यामुळे हा समुदाय गरिबीच्या गर्तेत सापडला आहे.  रेशन किट्स वाटपासारखे साहाय्य पुरवले जात असल्याने त्यांच्या कुटुंबाला पोटभर अन्न मिळते आणि इतर साहाय्य उपक्रमांमुळे त्यांना भविष्यासाठी स्वतःला सज्ज करण्यात मदत मिळते."

Post a Comment

0 Comments