राम बाग मधील रहिवाशी मतदानावर बहिष्कार घालणार सदोष प्रभाग रचना केल्याचा आरोप


ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे महानगर पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यात आलेली आहे. मात्र, मागील निवडणुकीप्रमाणेच यंदाच्या निवडणुकीमध्येही आपणांवर अन्याय केला आहे; मागील निवडणुकीत भू भाग प्रभाग क्रमांक 12 मध्ये दाखवून मतदारांना प्रभाग क्रमांक 6 मध्ये समाविष्ट करण्यात आले होते.


        आता नैसर्गिक सीमारेषा फेटाळून लावत प्रभाग क्रमांक 12 मध्ये असलेल्या भागाला प्रभाग क्रमांक 6 मध्ये समाविष्ट केले आहे, असा आरोप करीत 2022 च्या सार्वत्रिक निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा इशारा उपवन नजीकच्या रामबाग येथील मतदारांनी दिला आहे. 


        उपवनपासून नजीक असलेल्या रामबागमध्ये साधारणपणे 1200 मतदार आहेत. या सर्व मतदारांनी ठाणे महानगर पालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगाला निवेदन देऊन हा इशारा दिला आहे. येथील रहिवाशांनी दिलेल्या निवेदनानुसार, ठाणे महानगर पालिकेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीपासून नवीन प्रारुप आराखड्यातील प्रभाग क्रमांक 12 मध्ये रामबाग या परिसराचा समावेश करण्यात आला होता.


         सन 1986 ते सन 2017 पर्यंंत रामबाग या परिसराचा समावेश प्रभाग क्रमांक 12 मध्ये करण्यात आला होता. तर, सन 2017 च्या निवडणुकीत रामबागचा समावेश शास्त्रीनगर प्रभागामध्ये केलेला असतानाही मतदारांचा समावेश मात्र शिवाई नगर प्रभागामध्ये केला होता. ही बाब तेव्हाही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली असतानाही सुधारणा करण्यात आलेली नव्हती. आता तरी प्रभाग सीमांकन निश्चिती करताना रामबाग हा परिसर प्रभागातून वगळण्यात आलेला आहे.  

        वनखात्याने आपल्या भूखंडावर अतिक्रमण होऊ नये, यासाठी एक संरक्षक भिंत उभारली आहे. तसेच, भारतीय लष्करानेही आपल्या सरावासाठीच्या मैदानाला संरक्षक भिंत उभारली असल्याने रामबाग हा परिसर शास्त्रीनगरशी जोडला गेला आहे.  रामबागपासून सुरु झालेली वनखात्याची भिंत थेट शास्त्रीनगरपर्यंत येत आहे. तर पलिकडील बाजूस रस्ता आहे.  प्रभाग रचना ही भौगोलिक सलगता विचारात घेऊन करता येते. 

      यात प्रामुख्याने रस्ते, गल्ली, नद्या, नाले, डोंगर, मोठे रस्ते यांचा विचार करुन प्रभाग सलग करावा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. तरीही, नवीन आराखड्यानुसार तयार केलेल्या प्रभाग क्रमांक 12 मध्ये या आदेशांचा विचार न करता  वनखात्याने बांधलेली भिंत, लष्कराच्या सराव मैदानाची सीमानिश्चिती आणि रामबाग-शास्त्रीनगर अन् शिवाई नगर यांना विभागणार्‍या पोखरण रोड नंबर एक व दोन या मोठ्या रस्त्यांचा विचारच करण्यात आलेला नाही. 

       2017 च्या निवडणुकीत  मतदारांना इतर प्रभागात टाकल्यामुळे या परिसराकडे लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले होते; आताही तोच प्रकार होणार असल्याने आपण कोणालाही मतदानच करणार नाही, असा पवित्रा येथील नागरिकांनी घेतला आहे. दरम्यान, या संदर्भात आपण हरकतीही नोंदविल्या असून जर प्रभाग रचनेत दुरुस्ती केली नाही तर निवडणुकीवर बहिष्कार टाकून निषेध नोंदविण्यात येईल, असेही येथील नागरिकांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments