पेशवाईतील स्त्रियांची तत्कालीन मानसिकता. त्यांचे हक्क व आधिकार विषयावर व्याख्यान


डोंबिवली ( शंकर जाधव ) येथील शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण सभेत वसंतपंचमीचे औचित्य साधून  तिळगुळ समारंभनिमित्ताने मुलाखतकार व लेखिका मीना गोडखिंडी यांनी 'पेशवाईतील स्त्रियांची तत्कालीन मानसिकता. त्यांचे हक्क व आधिकार आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये' याविषयावर व्याख्यान आयोजित केले होते.
  

           कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊलींना पुष्पहार घालून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष प्रदीप जोशी संस्थेचे कार्याध्यक्ष सुधीर बर्डे महिला समितीच्या अध्यक्ष डॉ. अनुराधा कुलकर्णी आणि प्रमुख अतिथी व व्याख्यात्या मीना गोडखिंडी उपस्थित होत्या. अध्यक्ष  जोशी व कार्याध्यक्ष बर्डे यांनी मनोगत व्यक्त करताना संस्थेच्या कार्याचा, सेवाभावी उपक्रमाचा व सभासदांच्या सहकार्याचा आढावा घेतला. महिला समितीच्या अध्यक्ष व संतसाहित्याच्या अभ्यासक डॉ. अनुराधा कुलकर्णी यांनी महिला समितीच्या विविधांगी उपक्रमाचा गौरवपूर्ण उल्लेख केला. महिला शक्ती संघटीत असल्याने संस्थेच्या कार्यात महिला समितीचे भरीव योगदान असल्याचे सांगितले.

       मीना गोडखिंडी म्हणाल्या,  पेशवाई म्हणजे मराठी मनाचे मुक्त चिंतन आहे. तर पेशवाई म्हणजे यशापयशाचे दाहक सत्य आहे. पेशवाईला फुटीरतेचा व भाऊबंदकीचा जळजळीत शाप आहे. पण अटकेपार झेंडा फडकवणारी पेशवाई मराठी मनाचा अभिमानबिंदू आहे.१७१३ ते १८५१ या कालखंडाचा इतिहास पाहता पेशवाईतील स्त्रीशक्तीने समाजमनावर आपला ठसा निश्चितच उमटवला होता. पेशवाईत त्यांच्या गुणवैशिष्ट्येया नुसार त्यांना मानाचे स्थान होते. 


        पहिल्या पेशवीणबाई राधाबाईंना आरमाराविषयी आस्था होती व त्या पाणीप्रश्नांबाबत अतिशय जागरूक होत्या. गोपिकाबाईंनी स्रीयांच्या मानसिकतेचा विचार केला होता. तर रमाबाईंनी पर्यावरणाचा मंत्र जपला.त्या औषधी वनस्पतीच्या जाणकार होत्याच. 


         तर आनंदीबाई वस्त्रोद्योगाच्या जाणकार होत्या व त्यांच्या मुळेच पैठणी वीणकरांची आर्थिक घडी सुस्थिर झाली. पार्वतीबाई सुधारक द्रष्ट्या मानसिकतेच्या होत्या. सुगुणाबाईंच्या ग्रंथसंग्रहाची इतिहासकारांनी दखल घेतली होती. अश्या या सर्व पेशवीणबाईना स्वःताच्या मालमत्तेविषयी आधिकार होता. त्या स्वतंत्ररित्या खर्च करू शकत होत्या. 


         स्वःताच्या इच्छेनुसार त्या काशीयात्रेला किंवा मोहिमेवर जावू शकत होत्या. सती जाणे त्यांच्यावर बंधनकारक नव्हते. अशी ही पेशवेकालीन स्त्रीशक्ती आपल्या स्वतंत्र अस्तित्वाच्या पाऊलखुणा उमटवीत महाराष्ट्राच्या इतिहासात अजरामर झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौरी खुंटे यांनी केले तर वैशाली कोरडे यांनी आभार प्रदर्शनाची जबाबदारी सांभाळली.

Post a Comment

0 Comments