डोंबिवलीत घरात सोफा सेटमध्ये आढळला महिलेचा मृतदेह

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  डोंबिवली जवळच्या दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात धक्कादायक घटना घडली. घरातल्या सोफासेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिसांकडून तपास सुरु करण्यात आला आहे.


    डोंबिवली पूर्व भागातील दावडी येथील शिवशक्ती नगर परिसरात ओम रेसिडेन्सी बी विंगमध्ये राहणारे किशोर शिंदे हे मंगळवारी सकाळी कामावर गेले. त्यांची पत्नी सुप्रिया ही घरात एकटीच होती. मुलगा दुपारी साडेबारा वाजता शाळेत गेला होता. संध्याकाळी किशोर हे कामावरुन घरी परतले. पत्नी घरात नव्हती. त्यांनी तिचा शोध घेतला. ती कुठेही आढळून आली नाही. मित्र मंडळी नातेवाईकांसह सगळीकडे विचारपूस केली होती. 


     तरी कुठे गेली आहे हे समजून आले नाही. याच दरम्यान काही शेजारी आणि नातेवाईक घरात आले. किशोर हे पत्नी हरविल्याची नोंद करण्यासाठी नातेवाईक पोलिस ठाण्यात पोहचले होते. घरात दररोज येणार्‍या शेजार्‍यांना सोफा अस्तव्यवस्थेत दिसून आल्यावर त्यांनी तो सोफा चाचपला. त्यावेळीच त्यांना धक्का बसला. सुप्रिया हिचा मृतदेह सोफ्यात कोंबून ठेवला होता. सुप्रिया हिची गळा आवळून हत्या करण्यात आली होती. 


      वरीष्ठ पोलिस निरीक्षक, शेखर बागडे पोलिस निरिक्षक अनिल पडवळ आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक अविनाश वनवे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुप्रिया हिचा मृतदेह शवविच्छेदनाकरीता पाठविण्यात आला आहे. अखेर तिची हत्या कोणी व कशा करीता केली. तिच्यासोबत काही गैरप्रकार झाला आहे का याचा तपास पोलिस करीत आहेत. या प्रकरणात काही जणांना ताब्यात घेऊन पोलिसांकडून विचारपूस सुरु आहे.

Post a Comment

0 Comments