मानपाडा पोलीस ठाण्यात आरोपीचा संशयास्पद मृत्यू


डोंबिवली ( शंकर जाधव ) मानपाडा पोलीस ठाण्यातील विलगीकरण कक्षात असलेला एका आरोपीला आकडी येऊन तो डोक्यावर पडल्याने जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. मात्र त्याचा मृत्यू पोलिसी मारहाणीत झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. विनयभंगाच्या एका प्रकरणात या आरोपीला पोलिसांनी भुसावळ येथून अटक केली होती. दत्तात्रय वारके असे मृत आरोपीचे नाव आहे. 
   

            गेल्या वीस दिवसांपूर्वी दत्तात्रय वारकेवर मानपाडा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी त्याला शनिवारी जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथून अटक केली होती. रविवारी त्याला सुट्टीकालीन न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली. वारकेला आधारवाडी कारागृहात नेण्यापूर्वी त्याची करोना चाचणी करणे बंधनकारक असल्याने पोलिसांनी त्याला मानपाडा पोलीस ठाण्यातील विलगीकरण कक्षात आणून ठेवला होता. वारकेला दारुचे व्यसन होते.


         दारु न मिळाल्याने  तो अस्वस्थ झाला होता. रविवारी संध्याकाळी पोलिसांनी त्याला करोना चाचणीसाठी नेण्याची तयारी केली. त्यावेळी त्याला अचानक जोराने आकडी आली. तो जमिनीवर डोक्याच्या दिशेने पडला. जखमी झाल्याने त्याला तात्काळ पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दाखल केल्यानंतर दोन तास त्याने उपचाराला प्रतिसाद दिला. नंतर रात्री साडेआठ वाजता त्याचा मृत्यू झाल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना दिल्याचे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments