भिवंडीत पोलीस पकडण्यासाठी गेलेल्या चोराचा संशयास्पद मृत्यू,नागरीकांनी घातला गोंधळ...


भिवंडी :दि.11 (आकाश गायकवाड  )  भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरातील पिराणी पाडा या इराणी नागरीकांच्या वस्तीत एका अट्टल चैन स्नाचिंग करणाऱ्या चोरट्यास पकडण्यासाठी पोलीस पथक रात्री गेले असता त्यांच्यात झटपट होऊन तो आपल्या भावाच्या ताब्यात असताना त्याचा अचानक मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबियांसह स्थानिक नागरीकांनी पोलीसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत गोंधळ घालून मृतदेह घेऊन जाण्यास अडथळा केला .त्यानंतर स्थानिक पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या परिसरात तैनात करून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदना साठी मुंबई जेजे रुग्णालयात पाठविण्यात आला आहे .सादिक कंबल जाफरी असे मृत चोरट्याचे नाव आहे.

          सादिक कंबल जाफरी हा अट्टल चैन स्नाचिंग करणारा चोरटा असून त्याच्यावर अनेक पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून तो गुरुवारी रात्री पिराणी पाडा या इराणी वस्ती असलेल्या ठिकाणी आपल्या घरी आला असल्याची माहिती स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शीतल राऊत यांना मिळाली असता त्यांनी पोलीस पथकासह त्या ठिकाणी त्यास ताब्यात घेण्याची कारवाई किली असता पोलीस व चोरट्या मध्ये झटापट होऊन तो पळाला व आपल्या भावाच्या घरात आश्रयाला गेला असता त्या ठिकाणी काही वेळाने तो मयत झाल्यानंतर कुटुंबियांसह स्थानिक नागरीकांनी पोलिसांच्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत मृतदेह घेऊन जाण्यास अटकाव केला.


           त्यानंतर मोठ्या प्रमाणावर जमाव जमून पोलिसांना विरोध वाढल्यामुळे स्थानिक पोलीसांसह राज्य राखीव दलाच्या तुकड्या घेऊन पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील वडके ,प्रशांत ढोले यां सह मोठा पोलीस फौजफाटा घेऊन त्या ठिकाणी दाखल होत जमावास पांगवुन तेथील तणाव आटोक्यात आणून मृतदेह ताब्यात घेत सुरवातीला आयजीएम उपजिल्हा रुग्णालय येथे आणण्यात आला.


           या संपुर्ण प्रकरणाची चौकशी करून कुटुंबियांच्या मागणी नुसार मृतदेह शवविच्छेदना साठी जे जे रुग्णालय मुंबई येथे रवाना केले असल्याचे सांगत मृत्यूचे कारण स्पष्ट झाल्या नंतर उचित कारवाई करण्यात येईल अशी माहिती भिवंडी पोलीस उपायुक्त  योगेश चव्हाण यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments