डोंबिवली ( शंकर जाधव ) राष्ट्रीय शिक्षण संस्था संचालित स्वामी विवेकानंद विद्यामंदिर शाखांमधील पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा सन २०१९/ २० व सन २०२०/२१ शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा कौतुक समारंभ डोंबिवली पश्चिमेकडील विष्णुनगर येथील डॉ. हेडगेवार सभागृह राणा प्रताप भवनात येथे पार पडला.
याप्रसंगी राष्ट्रीय शिक्षण संस्था कार्यवाह संजय कुलकर्णी, सहकार्यवाह प्रमोद उंटवाले, कोषाध्यक्ष शिरीषजी फडके, संस्थेचे आजी - माजी सदस्य, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक , गुणवंत विद्यार्थी व त्यांचे पालकवर्ग उपस्थित होते. ईशस्तवन अरूणोदय (माध्यमिक) व स्वागतगीत विष्णुनगर(माध्यमिक) शाखेतील विद्यार्थ्यांनी सादर केले. समारंभा पुष्कर बाळकृष्ण रासम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.रासम यांनी बी. एम .एम. जर्नालिझम मुंबई युनिव्हर्सिटी मराठी तसेच अनेक हिंदी मालिकांचे दिग्दर्शन त्यांनी केले आहे.
व ते स्वामी विवेकानंद शाळेचे अरुणोदय शाखेचे माजी विद्यार्थी आहेत.समारंभाच्या सुरुवातीस नयना पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. विद्यार्थ्यांच्या पारितोषिक वितरणाच्या यादीचे वाचन सुजाता औटी यांनी केले. पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत विष्णुनगर प्राथमिक , दत्तनगर प्राथमिक व माध्यमिक या शाखांमधील एकूण १५ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.शिष्यवृत्ती प्राप्त एकूण १५ विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या व कार्यवाहांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
इयत्ता ५ वीतील प्रतिक्षा पिंपळकर, अपूर्वा सराफ,श्रेयस खोत,श्रेया पालांडे,स्वरा वालावलकर,वेदिका मांडे व नमिता लोके या शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचे मुलाखतीद्वारे मनोगत मांडले. संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबीर वर्गाचा फायदा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी झाल्याचे यावेळी विद्यार्थ्यांच्या मुलाखतीतुन सांगितले. संदेश गवारी व रंजना मोरे यांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाचे कौतुक केले.
प्रमुख पाहुणे रासम म्हणाले, आताचे विद्यार्थी चौथी - पाचवी इयत्तेत असतानाच कुठल्या क्षेत्रात नाव करायचे आहे ते ठरवतात. त्यामुळे पालकांनी मुलांना ज्या क्षेत्रात करिअर करायचे असेल ते त्यांना करु द्या. पालकांनी आपली मते त्यांच्यावर लादू नये. आपल्या शाळेत मिळालेली कौतुकाची थाप भविष्यात खूप हुरुप देऊन जाते. तुमच्यातील कला जोपासा त्या कलेचा उपयोग भविष्यात नक्की होतो हे पटवून देताना त्यांनी शाळेत आवड म्हणून जोपासलेल्या चित्रकला विषयात शाळेतील सर्व शिक्षकांचे मला मोलाचे मार्गदर्शन लाभले होते.
त्यामुळे मी माझ्या कला क्षेत्रात उच्च पदापर्यंत यशस्वीपणे पोचलो आहे. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रामचंद्रनगर शाखेच्या मुख्याध्यापिका उर्मिला चव्हाण , विष्णूनगर शाखेचे मुख्याध्यापक भोजराज रायसिंग व गोपाळ नगर शाखेच्या प्रभारी मुख्याध्यापिका भावना राठोड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे फलकलेखन पेडामकरकर व भोये सर यांनी केले.प्रास्ताविक राष्ट्रीय शिक्षण संस्था कार्यवाह संजय कुलकर्णी यांनी केले.
तर कार्यक्रमात सूत्रसंचालनाची जबाबदारी वैशाली निंबाळकर यांनी सांभाळली कार्यक्रमात आभार प्रदर्शन राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सहकार्यवाह उंटवाले यांनी केले. कार्यक्रमाची सांगता ओवी मोंडे हिच्या संपूर्ण वंदे मातरम् गायनाने झाली.
0 Comments