अमरावती महापालिका आयुक्तांच्या अंगावर शाई फेकल्या प्रकरणी ठामपा अधिकारी, कर्मचाऱ्यांनी दिले पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना निवेदन

■हल्लेखोरांवर तात्काळ कडक कारवाई करण्याची केली मागणी

ठाणे : अमरावती शहरातील राजापेठ उड्डाणपुलाची पाहणी करत असताना काही महिलांनी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्या अंगावर शाई फेकल्या प्रकरणी या घटनेचा ठाणे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांनी जाहीर निषेध करत हल्लेखोरांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे निवेदन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आज महापालिकेच्या कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे देण्यात आले. 


       यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, नगर अभियंता प्रशांत सोनग्रा, उप आयुक्त मारुती खोडके, उप आयुक्त मनीष जोशी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, उप आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे आदी उपस्थित होते.


     अमरावती येथील राजापेठ उड्डाणपुल व परिसराची पाहणी करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर गेले होते. त्या ठिकाणाची पाहणी करताना काही अज्ञातांनी त्यांच्यावर शाईफेक केली. यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने त्यांना वाचवण्यासाठी खूप प्रयत्न केला. पण त्यावेळी अज्ञातांनी मोठ्या प्रमाणात मनपा आयुक्तांवर शाईफेक करून तिथून पळ काढला. शासकीय अधिकाऱ्यांवर अशा प्रकारे हल्ला करणे हे निषेधात्मक असून ठाणे महापालिका अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून या घटनेचा जाहीर निषेध नोंदविण्यात येत आहे. 


      अमरावतीमधील या घटनेचा ठाणे महापालिका सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून जाहीर व्यक्त करण्यात येत असून हल्लेखोरांवर तात्काळ कडक कारवाई करण्याचे निवेदन आज राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना देण्यात आले. यासोबतच सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांना देखील याबाबत निवेदन देण्यात आले आहे. 

Post a Comment

0 Comments