भंडार्लीसह 14 गावातील ग्रामस्थांनी घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाला सहकार्य करण्याचं नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचं आवाहन

■14 गावातील पायाभूत सुविधांचे प्रश्न तातडीने सोडवण्याचे आश्वासन..


ठाणे :- भंडार्ली येथील खासगी जागेतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प हा तात्पुरत्या स्वरूपात राबविण्यात येणार असून तो त्याठिकाणी कायमस्वरूपी नसेल, अशी ग्वाही देत ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी संघर्ष समितीला या तात्पुरत्या प्रकल्पासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तसेच, १४ गावातील समस्या सोडवण्याची ग्वाहीही दिली.


       भंडार्ली येथे प्रस्तावित असलेल्या या घनकचरा प्रकल्पाला १४ गाव संघर्ष समितीने विरोध केला होता. ठाणे शहरातील कचऱ्याची विल्हेवाट आपल्या विभागात नको, अशी भूमिका घेऊन त्यांनी या प्रकल्पाचे काम त्वरित थांबवण्याची मागणी केली होती. या प्रकल्पाला विरोध करणाऱ्या ग्रामस्थांची समजूत घालण्यासाठी आज ठाणे महानगरपालिकेने पुढाकार घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांची एक विशेष बैठक आयोजित केली होती. 


       या बैठकीत भंडार्ली येथे प्रस्तावित असलेल्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाची सत्य परिस्थिती ग्रामस्थांना समजावून सांगण्यात आली. दिवा येथील डम्पिंग ग्राऊंडची क्षमता संपल्याने, तसेच डायघर येथील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित व्हायला वर्षभराचा कालावधी लागणार असल्याने  भंडार्ली येथील हा प्रकल्प तात्पुरत्या स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. हा प्रकल्प मर्यादित कालावधीसाठी राबविण्यात येणार असल्यानेच खासगी जागेवर फक्त वर्षभराचा भाडेकरार करून तो राबविण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.


         तसेच, या प्रकल्पात ओल्या कचऱ्यावर कंपोस्टिंग करण्यात येणार असून सुका कचरा वेगळा करण्यात येणार आहे. त्यामुळे इथे कोणत्याही प्रकारचे डम्पिंग कायमस्वरूपी करण्यात येणार नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले. ठाणे महानगरपालिकेकडून दोन हजार कोटी रुपये खर्च करून १२०० मेट्रिक टन कचऱ्यापासून वीजनिर्मिती करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प डायघर येथे राबविण्यात येणार असून तो पूर्ण होण्यास वर्षभराचा अवधी लागणार आहे.


        या प्रकल्पाच्या आड महावितरण कंपनीचे टॉवर येत असल्याने ते हटविण्यासाठी २१ कोटी रुपये महावितरण कंपनीकडे जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे भंडार्ली येथील प्रकल्प कायमस्वरूपी नसून काही काळासाठीच असल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले. 


         नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रकल्पासाठी राजी होण्याची विनंती ग्रामस्थांना केली. संघर्षाने कोणताही प्रश्न सुटत नसतो, मात्र संवादाने त्यावर नक्की मार्ग काढता येऊ शकतो, असं सांगून या प्रकल्पाची सद्यस्थिती आपल्यासमोर मांडण्यात आली असून तो राबविण्यासाठी तयार व्हावं, असं आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केलं. तसेच, १४ गावातील पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, रस्ते यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून यापूर्वीच कामे सुरू करण्यात आली असून उर्वरित कामेही वेगाने पूर्ण करू, असे सांगितले. 


       या कचऱ्यावर प्रक्रिया करून केमिकलची फवारणी करून त्यानंतरच तो इथे आणला जाणार असल्याने त्यामुळे कोणतीही दुर्गंधी पसरू नये, अशा सक्त सूचना अधिकाऱ्यांना दिलेल्या असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले. घनकचऱ्याची विल्हेवाट लावणे हा प्रत्येक मनपासमोरील मोठा प्रश्न असून तो सोडवणे ही आपल्या सगळ्यांची प्राथमिकता आहे. 


       काही काळासाठी केलेले हे सहकार्य तुम्हाला गावांचा पूर्ण कायापालट करण्याची संधी मिळवून देऊ शकते. त्यामुळे या प्रकल्पासाठी तयार होण्याचे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले. 


       आयुक्त बिपीन शर्मा यांनी यावेळी या प्रकल्पाची पूर्वतयारी म्हणून आम्ही या गावात जाण्यासाठी रस्ता, पथदिवे, तसेच इतर सोयी करून देत आहोत तसेच कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी खास मशिन्सची चार कोटी खर्च करून खरेदी करत आहोत. नुसतं डम्पिंग करणे आता शक्य नसून सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार फक्त घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प राबवणेच शक्य आहे. 


       त्यातही डायघर येथील प्रस्तावित घनकचरा व्यवस्थापनाचा पहिला टप्पा पुढील सहा महिन्यांत कार्यान्वित होणार असल्याने त्यानंतर भंडार्ली येथे कचरा नेण्याची गरज लागणार नाही, फक्त काही महिन्याचा प्रश्न असल्याने ग्रामस्थांनी त्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 


       ठाणे महानगरपालिकेचे महापौर नरेश म्हस्के यांनी १४ गावांच्या प्रत्येक लढ्यात शिवसेना आणि शिंदे साहेब कायम तुमच्या पाठीशी उभे राहिले होते. नेवाळी येथे झालेल्या आंदोलनात स्वतः सरकारमध्ये मंत्री असूनही त्यांनी ग्रामस्थांची बाजू घेतली. आताही हा प्रश्न सामंजस्याने सोडवण्यासाठी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनीही विनंती केली आहे. त्यामुळेच शिंदे साहेबानी तुमच्याशी संवाद साधण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे या प्रकरणात राजकारण न होऊ देता आपले आणि परके कोण याचा सारासार विचार करून याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, असे आवाहन केले. 


      १४ गाव ग्रामस्थ संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष लक्ष्मण पाटील यांनी यावेळी या बैठकीचे आयोजन केल्याबद्दल ठाणे महानगरपालिकेचे आभार मानले. तसेच, पालकमंत्री शिंदे यांच्याशी बोलल्यानंतर अनेक शंकांचे समाधान झाले असल्याचे स्पष्ट केले. मात्र, तरीही आजच्या बैठकीत मिळालेली माहिती ग्रामस्थांपर्यन्त मांडून त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी सात दिवसांची मुदत देण्याची विनंती केली. ही विनंती पालकमंत्री शिंदे यांनी मान्य करून याबाबत पुन्हा बैठक घेण्याला मान्यता दिली. 


       यावेळी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, ठाणे महानगरपालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त मनीष जोशी, पोलिस उपायुक्त अविनाश अंबुरे,  ठाणे पोलिस आयुक्तालयातील इतर पोलीस अधिकारी आणि १४ गाव संघर्ष समितीचे सर्व प्रमुख सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments