भिवंडीतील मानसरोवर येथील STP प्लांट बंद होणार..?शिवसेना विभाग प्रमुख प्रसाद पाटील यांनी घेतली पालकमंत्र्यांची भेट..


भिवंडी दि 19(प्रतिनिधी ) शहरातील महानगरपालिका हद्दीत भूयारी गटार योजने अंतर्गत मलनिःसारण प्रकल्प सुरू आहे. या प्रकल्पाचे उदंचन केंद्र (STP Plant) प्रभाग समिती क्र.३ च्या मानसरोवर, फुलेनगर येथे उभारले जात आहे. शहरातील संपूर्ण मैला याच ठिकाणी जमा होणार आहे. आणि हे संपूर्ण क्षेत्र निवासी आहे. 


         त्यामुळे भविष्यात येथील स्थानिक रहिवाशांचे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार असल्यामुळे येथील शिवसेनेचे विभागप्रमुख प्रसाद पाटील यांनी हा प्लांट उभारणे सुरु झाल्यापासूनच विरोध केला होता. मात्र, पुन्हा याचे काम सुरु झाल्यामुळे प्रसाद  पाटील आणि स्थानिक रहिवाशांनी गेल्या शुक्रवारी हे काम बंद करण्यासाठी जमाव जमा केला म्हणून त्यांचेवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


            यानंतर  शिवसेनेचे विभागप्रमुख प्रसाद  पाटील यांनी नगरसेवक अशोक भोसले यांच्यासह  राज्याचे नगरविकासमंत्री तथा पालकमंत्री एकनाथ शिंदे  यांची भेट घेऊन वस्तुस्थिती आणि स्थानिक रहिवाशांच्या भावना त्यांच्या लक्षात आणून दिल्या. पालकमंत्र्यांनी तात्काळ या गंभीर विषयाची दखल घेऊन लवकरच एक समिती चौकशीसाठी पाठविण्याचे आश्वासन दिले. 


          त्यामुळे वराळदेवी तलावाच्या पिण्याच्या पाण्याचा परिसर, रहिवासी ठिकाण लक्षात घेऊन STP प्लांट ला स्थगिती मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेचे विभागप्रमुख प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने हे शक्य होणार असल्यामुळे स्थानिक मानसरोवर आणि फुलेनगर येथील रहिवाशांकडून त्यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे!

Post a Comment

0 Comments