भिवंडीत भात खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची भात विक्री साठी झुंबड..


भिवंडी दि 6 (प्रतिनिधी ) राज्य शासनाच्या खरेदीविक्री महासंघाच्या माध्यमातून ठाणे जिल्ह्यात 31 जानेवारी पर्यंत भात खरेदी सुरू राहणार असली तरी भिवंडी तालुक्यातील दुगाडफाटा येथील खरेदी विक्री महासंघाच्या गोदमावर शेतकऱ्यांची भात विक्री साठी झुंबड उडाल्याने तेथील गोदाम कर्मचाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली आहे .भिवंडी तालुक्यातील पडघा ,बापगाव ,लोनाड,अंबाडी,दिघाशी,चिंबीपाडा या भागात आज ही मोठ्या प्रमाणावर भातशेती केली जात असून त्यावर अनेकांचा उदरनिर्वाह होत आहे .


            शेतकऱ्यांना हमीभाव देऊन भात खरेदी करण्या साठी शासन स्तरावर खरेदीविक्री महासंघास शेतकऱ्यांना कडील साधारण प्रतीचा भात 1940 रुपये प्रति क्विंटल हमीभाव देऊन 31 जानेवारी पर्यंत ऑनलाईन नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यां कडून खरेदी करण्याचा निर्णय घेतला असताना भिवंडी तालुक्यात सध्या दुगाडफाटा येथील एकमेव भातखरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची झुंबड उडाली आहे.


           तालुक्यातील हिवाळी शेतीमाल खरेदीविक्री सहकारी सोसायटी लि. व झिडके येथील जय किसन भात गिरणी या दोन सहकारी संस्थांना भात खरेदीसाठी खरेदीविक्री संघाने मान्यता दिली असून झिडके येथील भात खरेदी बंद असल्याने सर्व शेतकऱ्यांनी आपला मोर्चा दुगाडफाटा येथे वळविल्याने या ठिकाणी खरेदी केलेला भात साठवणुकीची सुध्दा गैरसोय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


           दुगाडफाटा येथील भातखरेदी केंद्रावर तब्बल 2200 शेतकऱ्यांनी भात विक्री साठी नोंदणी केली असून आतापर्यंत 650 शेतकऱ्यांचे 16 हजार क्विंटल भात खरेदी केल्याची माहिती गोदाम व्यवस्थापक लहू घोडविंदे यांनी देत  31 जानेवारी पर्यंत भात खरेदीस शासनाने परवानगी दिल्याने या काळात आपला भात विक्री होणार नाही या भीतीने शेतकरी भात घेऊन केंद्रावर दाखल होत आहेत अशी महिती लहू घोडविंदे यांनी दिली.


         शासनाने भात खरेदी साठी अधिक संस्थांना संधी देण्याची गरज असून झिडके व पडघा येथील साठवणूक क्षमता कमी असल्याने त्यांच्या भात खरेदीस मर्यादा आल्या असून त्यामुळे दुगाडफाटा येथील केंद्रावरील ताण वाढला असल्याचे बोलले जात आहे .तर गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी देखील 31 मार्च पर्यंत भात खरेदी करण्याची मुदत मिळावी त्याच प्रमाणे बोनस देखील जाहीर करावा अशी मागणी शेतकरी शिवाजी राऊत यांनी शासनाकडे मागणी केली आहे.

Post a Comment

0 Comments