ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन दादोजी कोंडदेव प्रेक्षकगृह, ठाणे.६६वी ठाणे जिल्हा निवड चाचणी कबड्डी स्पर्धा - २०२१ /२२.

रा.फ. नाईक, संकल्प, ज्ञानशक्ती, होतकरू यांनी ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड कबड्डी स्पर्धेच्या महिला गटाची उपांत्य फेरी गाठली.


भिवंडी दि. ४ :- ठाणे जिल्हा कबड्डी असो.ने उजाळा क्रीडा मंडळ-वळगांव यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या "६६व्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी" स्पर्धेच्या महिला गटात रा.फ.नाईक, संकल्प, ज्ञानशक्ती, होतकरू यांनी उपांत्य फेरी गाठली. रा.फ.नाईक विरुद्ध संकल्प तर ज्ञानशक्ती विरुद्ध होतकरू अशा उपांत्य लढती होतील. 


       भिवंडी-वळगांव येथील स्व.जाईबाई काशिनाथ पाटील क्रीडानगरित सुरू असलेल्या महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात गतविजेत्या रा.फ.नाईक संघाने जय बजरंग संघाचे कडवे आव्हान ३७-३४ असे परतवून लावत उपांत्य फेरीत धडक दिली. 


      मंगल चिकणे, साक्षी सावंत यांनी आक्रमक सुरुवात करीत विश्रांतीपर्यंत १९-१२अशी बऱ्यापैकी आघाडी घेतली होती. शेवटी तीच त्यांच्या कामी आली. जय बजरंगच्या साक्षी भोईर, विद्या दिनकर, सोनाली शेलार यांनी उत्तरार्धात आपले आक्रमण अधिक धारदार करीत सामन्यातील चुरस कायम ठेवली.तरीपण ३गुणांच्या फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला. 


      दुसऱ्या सामन्यात संकल्प मंडळाने प्रेरणा कला क्रीडा मंडळाला ४५-३१ असे पराभूत करीत आपली आगेकूच सुरू ठेवली. वैष्णवी साळुंखे,मेघना खेडेकर यांच्या चतुरस्र खेळाच्या बळावर संकल्पने मध्यांतरालाच २२-१२ अशी भक्कम आघाडी घेतली होती. उत्तरार्धात आपल्या खेळातील जोश कायम ठेवत १४गुणांच्या फरकाने सामना आपल्या नावे केला. 


       प्रेरणाची चंद्रिका केळकर-जोशी एकाकी लढली. ज्ञानशक्तीने शिवतेजला ३३-२४असे नमवित आपली घोडदौड कायम राखली. मानसी गायकर, प्रतिक्षा वाबळे, निधी जोशी, उर्मिला मढवी यांच्या चढाई-पकडीच्या उत्कृष्ट खेळाने ज्ञानशक्तीने हा विजय मिळविला. शिवतेजच्या प्रणाली व निधी या मोरे भगिनी चमकल्या.


         शेवटच्या उपांत्यपूर्व सामन्यात होतकरूने छत्रपती शिवाजी महाराज मंडळाचा ५०-२० असा सहज पाडाव करीत उपांत्य फेरी गाठली. सुरुवातीपासून धुव्वादार खेळ करीत पूर्वार्धातच २६-१० अशी मोठी आघाडी घेणाऱ्या होतकरूने उत्तरार्धातही तोच जोश कायम ठेवत गुणांचे अर्धशतक काढले. प्राजक्ता पुजारी, चैताली, श्रुती यांच्या नेत्रदीपक खेळाला या मोठ्या विजयाचे श्रेय जाते. 


         पुरुष व्यावसायिक गट स्पर्धेला आजपासून सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात विशाल टूर्स अँड ट्रव्हलने विघ्नहर्ता इंटरप्राइजेसचा ३८-३० असा पाडाव केला. ऋषिकेश कदम, राकेश मोकल या विजयाचे शिल्पकार ठरले. विघ्नहर्ताचे सुरेंद्र भोईर, आकाश गुप्ता चमकले. बर्थ डे डॅशने ए.बी.एसला २९-२१ असे नमवित दुसरी फेरी गाठली.


        विजयी संघाचे सागर पाटील, तेजेंद्र म्हात्रे, तर पराभूत संघाचे अक्षय पाटील, सुशील कदम छान खेळले. क्रिश ऍक्वने ५-५ चढईच्या जादा डावात पुरुषोत्तम इंटरप्राइझला ४८-४७ असे चकविले. पुरुषीत्तमने १५-२५ गुणांच्या पिछाडीवरून ४१-४१ अशी बरोबरी साधली. पण विजय काय त्यांच्या आवाक्यात आला नाही.

Post a Comment

0 Comments