कोरोनाच्या वाढत्या पार्श्व भूमीवर महापालिका आयुक्तांनी घेतला आरोग्य यंत्रणेचा आढावा

■लसीकरणा सोबत आरटीपीसीआर व ॲन्टीजन चाचण्या वाढविण्याच्या दिल्या सूचना..

ठाणे , : ओमिक्रॉन आणि कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य यंत्रणेचा आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी आढावा घेवून सर्व सुविधा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देतानाच शहरात लसीकरणासोबत आरटीपीसीआर व अँन्टीजन चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


           महापालिकेच्या कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे ओमिक्रॉन व्हेरिएंट व कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्यावतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजना सुविधांबाबतची आढावा बैठक संपन्न झाली.  या बैठकीस उप आयुक्त मारुती खोडके, अशोक बुरपल्ले, ज्ञानेश्वर ढेरे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भीमराव जाधव, सर्व प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.


        ठाणे महापालिकेच्या पार्किंग प्लाझा या कोविड रुग्णालयात आवश्यक औषधसाठा, व्हेटीलेंटर्स, ऑक्सीजन सुविधा व इतर वैदयकीय सुविधा तसेच रुग्णवाहिका सज्ज ठेवण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. तसेच वोल्टास कोव्हीड हॉस्पिटलची संपूर्ण यंत्रणा देखील सुसज्ज ठेवण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान ठाणे शहरात परदेशातून आलेल्या नागरिकांशी दैनंदिन संपर्क साधून त्यांची आरटीपीसीआर चाचणी करणे व आवश्यकता भासल्यास त्यांना कॉरंटाईन करणे, यासोबतच कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची मोहीम हाती घेण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.


     कोरोनाच्या वाढत्या संसर्गाबाबत आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीकोनातून मास्क वापरणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, सोशल डिस्टन्सींग आदीं गोष्टीचे पालन करणे गरजेचे असून प्रभाग समिती स्तरावर मास्क न वापरणाऱ्यांवर दंडात्मक कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले. 


       तसेच स्टेशन परिसर व प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आरटीपीसीआर व अँन्टीजन चाचण्यांची संख्या वाढविण्याच्या सूचनाही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत.

Post a Comment

0 Comments