शहरात एकाचवेळी १६ केंद्रावर शिस्तबद्ध लसीकरणास सुरुवात ठाणे महापालिकेचे हे मोठे पाऊल : पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे

■ठाण्यात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ


ठाणे ,3 : ठाणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरात एकाचवेळी १६ लसीकरण केंद्रावर १५ ते १८वयोगटातील मुलांचे लसीकरण सुरु झाले असून कोरोनाच्या लढाईत महापालिकेने लसीकरणाचे महत्वपूर्ण पाऊल उचलले असल्याचे मत राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली आज ब्राह्मण शिक्षण मंडळ संचलित वर्तक नगर माध्यमिक विद्यालय येथे संपन्न झालेल्या लसीकरण शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.


        या शुभारंभप्रसंगी खासदार राजन विचारे, उपमहापौर सौ. पल्लवी पवन कदम, स्थायी समिती सभापती संजय भोईर, सभागृह नेते अशोक वैती, विरोधी पक्षनेते अशरफ उ. शानू पठाण, आरोग्य परिरक्षण व वैद्यकीय सहाय्य समिती अध्यक्षा सौ. निशा पाटील, वर्तकनगर प्रभाग समिती अध्यक्षा सौ.राधिका फाटक, नगरसेविका सौ. कल्पना पाटील, श्रीमती. विमल भोईर, सौ. परिषा सरनाईक, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे, शिक्षणाधिकारी श्रीमती दहितुले, ब्राह्मण शिक्षण मंडळाचे केदार जोशी आदी उपस्थित होते.


         यावेळी बोलताना पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे म्हणाले की, आरोग्य मंत्रालयाने जाहिर केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार ठाणे महापालिका हद्दीत १५ ते १८ वयोगटातील किशोरवयीन मुलांच्या लसीकरणास सुरूवात करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे प्राधान्याने लसीकरण पूर्ण करण्यासाठी महापालिकेने संपूर्ण तयारी केली असून हे लसीकरण वेळेत पूर्ण करण्यात येईल.


          दरम्यान कोरोनाचा संसर्ग वाढत आहे, आपण सर्वानी कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट अनुभवली आहे, दुसरी लाट ओसरत असतानाच आता रुग्णांची संख्या वाढत आहे. परंतु कोरोना काळात ठाणे महापालिकेने उल्लेखनीय कार्य केल्याचे पालकमंत्री ना.एकनाथ शिंदे यांनी यावेळी नमूद केले. ठाणे महापालिकेने ठाणेकरांना अद्ययावत आरोग्य सुविधा दिल्या असून ओमिक्रोन व्हॅरियंट, डेल्टा आणि कोरोनाचा सामना करण्यासाठी प्रशासन सज्ज असून पालिकेने केलेल्या या कार्याचे पालकमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी विशेष कौतुक केले.


      ठाणे महानगरपालिकेच्यावतीने ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालय (ठाणे कॉलेज) क्रिक रोड ठाणे प., सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय, परबवाडी, ठाणे, आनंदनगर लसीकरण केंद्र –चेकनाका ठाणे पूर्व, आर.जे. ठाकूर महाविद्यालय-लोकमान्यनगर, ठाणे, ब्राह्मण विद्यालय, वर्तकनगर, ठाणे, सेंट झेवियर्स शाळा, मानपाडा, ठाणे, सरस्वती शाळा, आनंदनगर, कासारवडवली ठाणे, ब्राह्मण शिक्षण मंडळ इंग्लिश मिडियम स्कूल, घंटाळी मंदिरामागे, घंटाळी ठाणे, महिला लसीकरण केंद्र, टेंभीनाका, ठाणे प.,सहकार विद्या प्रसारक मंडळ (सह्याद्री शाळा), मुंबई पुणे रोड कळवा, काळसेकर महाविद्यालय, मुंब्रा,  एस.एन.जी. शाळा, दिवा, जी.आर.पाटील महाविद्यालय, मुंब्रा, आपला दवाखाना राबोडी, पार्किंग प्लाझा, (ऑनलाईन), ठामपा शाळा क्र. १८ मेंटल हॉस्पिटलजवळ आणि ज्युपिटर रुग्णालयाशेजारी, ठाणे या लसीकरण केंद्रावर १५ ते १८ वयोगटातील मुलांचे लसीकरण आज पासून सुरू करण्यात आले आहे. तर ठाण्यातील पार्किंग प्लाझा या लसीकरण केंद्रावर ऑनलाईन पध्दतीने लसीकरण सुरू असून यासाठी कोविन ॲपवर नोंदणी करणे आवश्यक आहे.

Post a Comment

0 Comments