कल्याणचा अविनाश पाटील प्राईड ऑफ यंग हिंदुस्थान पुरस्काराने सन्मानित

■यंगिस्तान फाउंडेशनने घेतली वृक्षसंवर्धनाच्या सातत्यपूर्ण कामांची दखल


कल्याण : यंगिस्तान फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय स्तरावर दिला जाणारा प्राईड ऑफ यंग हिंदुस्थान पुरस्कार कल्याणच्या अविनाश पाटीलला उल्हासनगर येथे पार पडलेल्या पुरस्कार सोहळ्यात देण्यात आला.

 
        अविनाश पाटील हा टीम परिवर्तन आणि अंघोळीची गोळी संस्थेसोबत आरोग्य, शिक्षण, क्रीडा, पर्यावरण अशा विषयांवर काम करत असतो. दुर्गम आणि दुर्लक्षित आदिवासी परिसरात विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू पुरवणे, शिक्षणाचा प्रचार प्रसार व्हावा यासाठी सामाजिक संस्थांना, गावांना पुस्तके देऊन त्या ठिकाणी ग्रंथालय उभारण्याचे काम अविनाश सातत्याने करत आहे त्याचबरोबर अंधश्रद्धा निर्मूलन समितीसोबत देखील अविनाश विविध उपक्रमात सक्रीय सहभाग घेत असतो. 


              अविनाश उत्तम राष्ट्रीय खेळाडू असुन शालेय जीवनापासूनच सामाजिक कामात आपले योगदान देण्याचा प्रयत्न त्याने केला आहे. अविनाशने समाजकार्य महाविद्यालय निर्मला निकेतन मुंबई येथुन समाजकार्याचे व्यावसायिक शिक्षण पुर्ण केले आहे आणि सध्या मुंबई विद्यापीठाच्या ग्रामीण विकास विभागात आपले पीएचडीचे शिक्षण घेत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पर्यावरण आणि क्रीडा क्षेत्रांतील या युवकाची आवड आज सामाजिक कार्यात बदलली आहे. सध्या आपल्या मित्रमंडळींच्या मदतीने वृक्षविषयक कायद्यांच्या प्रचार प्रसारासाठी खिळेमुक्त झाडं अभियान अविनाश राबवत आहे. 


           दुर्गम परिसरातील मुलांचा शैक्षणिक प्रवास सुखकर करण्यासाठी सायकल आणि शैक्षणिक साहित्य गरजूंना देण्याचे कामही तो करत आहे. अविनाशच्या कामाला अनेक सामाजिक संस्था आणि युवकांची मोठी साथ मिळत आहे. कोणताही पुरस्कार जोमाने काम करण्याची प्रेरणा देतो युवक म्हणुन नक्कीच हा पुरस्कार अधिक ऊर्जा देत राहील असे अविनाशने यावेळी सांगितले त्याचबरोबर सामाजिक कार्यात युवकांनी मोठ्या प्रमाणात येण्याचे आवाहनही यावेळीं त्यानें केले.

Post a Comment

0 Comments