दगड खाणीमुळे कांबा पठार पाड्यातील आदिवासी बांधव त्रस्त

■घरांच्या भिंत्तीला गेले तडेजीव मुठीत धरुन राहतात आदिवासी...


कल्याण : कल्याण तालुक्यातील कांबा ग्रामपंयातीनजीक असलेल्या पठारपाडय़ातील आदिवासी नागरीकांची दगडखाणींनी झोप उडवली आहे. दगडखाणीत केल्या जाणाऱ्या ब्लास्टिंग मुळे त्यांच्या घरांच्या भिंत्तींना तडे गेले आहे. त्यामुळे हे लोक जीव मुठीत धरुन राहत आहेत. या दगडखाणींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी पठारपाडय़ावरील आदिवासी बांधवांना सरकारी यंत्रणांकडे केली आहे.


कल्याण तालुक्यात कल्याण मुरबाड रोड लगत कांबा गाव आहे. या कांबा ग्रामपंचायतीत असलेल्या पठारपाडा येथे आदिवासी बांधवांची ३५ घरे आहेत. याठिकाणी १७५ लोकांची लोकवस्ती आहे. या पाडय़ाशेजारी असलेल्या दगडखाणीतून दगड काढण्यासाठी स्फोट केले जातात. त्यामुळे या नागरीकांची झोप हराम झाली आहे. या ब्लास्टिंग मुळे नागरिकांच्या माती आणि विटांच्या बांधकाम असलेल्या घरांना तडे गेले आहेत. या तडे गेलेल्या घरात आदिवासी बांधव रात्रीचे झोपत नाही. रात्री घराची भिंत कोसळण्याची भीती असल्याने या ठिकाणचे रहिवासी लहान मुलांसह हे लोक घरांच्या अंगणात झोपतात. सध्या प्रचंड थंडी आहे. त्यामुळे मुलांना घेऊन थंडीत ही मंडळी घराबाहेर झोपतात.


स्टोन क्रशर मशीनमुळे ध्वनी प्रदूषण होते. त्याचाही त्रास आदिवासी बांधवाना  होतो. दुसरीकडे धुळीमुळे या पाड्यातील शेतजमिनी देखिल नापीक होऊ लागल्या आहेत. या बाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत, तहसीलदारांपासून ते मुख्यमंत्र्यापर्यंत पत्रव्यवहार केला मात्र अद्याप यावर शासनाने तोडगा काढलेला नाही. अधिकारयांकडून पाहणी पलीकडे काहीच कारवाई झाली नसल्याचं या ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे आता आम्ही जगावे की मरावे असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. सरकारने  तक्रारीची दखल घेऊन या त्रासातून आमची  सूटका करावी अशी मागणी केली आहे.


दरम्यान यासंदर्भात प्रांत अधिकारी अभिजीत भांडे पाटील यांनी पठारपाडय़ावर १०० वर्षापासून हे आदिवासी बांधव वास्तव्य करुन आहेत. या ठिकाणी काही दगडखाण मालकांना लीजवर दगडखाणीकरीता जमीन दिली आहे. या खाणीचा त्रास आदीवासी बांधवांना होते असल्याची तक्रार जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या आधारे मी स्वत: जाऊन घटनास्थळी पाहणी केली होती. आदिवासी यांची तक्रार रास्त आहे. मात्र आदिवासीयांना त्रास होणार नाही. तसेच दगडखाणीचा व्यवसाय ही सुरु राहिल यावर मध्यम मार्ग काढण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यलयास पाठविण्यात आल्याचे सांगितले.

Post a Comment

0 Comments