डोंबिवलीत धोकादायक मांजावर कारवाई

 


डोंबिवली ( शंकर जाधव )  मकर संक्रांतीच्या काळात खेळल्या जाणाऱ्या पतंगांचा मांज्यामुळे पशुपक्षांचा नाहक बळी जातो. अशा धोकादायक असलेल्या नायलॉन मांजाचा साठा करून त्याची विक्री करणाऱ्या डोंबिवलीत राहणाऱ्या एका दुकानदारावर गुन्हे अन्वेषण विभागाने कारवाई करून गुन्हाही दाखल केला.

   
         पतंगांसाठी वापरला जाणारा मांजा पर्यावरणास हानिकारक ठरत असल्याने पोलिसांनीहीत्यावर लक्ष केंद्रित केले आहे. स्थानिक पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाने पतंगांच्या मांजावर कारवाया करण्यासाठी गस्ती वाढवल्या आहे. विक्री, साठा व वापरावर बंदी घालण्यात आली असतानाही पश्चिम डोंबिवलीतल्या महात्मा फुले रोडला असलेल्या धर्मा भुवन इमारतीच्या 6 क्रमांकाच्या खोलीत एकजण पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉन मांजाचा साठा करून विक्री करत असल्याची खबर कल्याण गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली होती. 


         ही माहिती कळताच पोलिसांनी सदर खोलीवर धाड मारली. या कारवाईत दुकानदाराच्या खोलीतून 8 हजार रूपये किंमतीचा पतंग उडविण्यासाठी वापरण्यात येणारा नायलॉनचा 16 रोल मांजा हस्तगत करण्यात आला. तर या मांज्याचा साठा आणि विक्री करणाऱ्या शिवाजी धर्मा जाधव (52) नामक दुजानदाराला अटक करण्यात आली.
 

          या प्रकरणी विष्णूनगर पोलिस ठाण्यात सदर दुकानदाराच्या विरोधात भादंवि कलम 188 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मकर संक्रांत सणात पतंग उडवायला हरकत नाही. मात्र याच पतंगांच्या मांजामुळे निरपराध पशु-पक्ष्यांचे जीव वेळप्रसंगी धोक्यात येतात. त्यामुळे पतंगप्रेमींनी या सर्व गोष्टींचेही भान ठेवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments