संचार बंदीत चाले रात्रीचे "हुतूतू" सामने : हजारो प्रेक्षकांची उपस्थित मात्र पोलिसांना खबरच नाही..


 भिवंडी दि 1 (प्रतिनिधी ) कोरोनासह ओमायक्रोनचा धोका वाढल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून तिसरी लाट रोखण्याचे प्रयत्न सुरु केले. त्यानुसार पुन्हा कोरोना   नियमांवली नव्याने जाहीर करीत रात्रीची संचारबंदी लागू केली. त्यातच  भिवंडी पालिका प्रशासनाकडून  बंदिस्त प्रेक्षागृहात महापौर चषक कबड्डीचे आयोजन  केले. 


        विशेष म्हणजे  संचारबंदी असताना मध्यरात्री पर्यत   "हुतूतू" सामने  हजारो प्रेक्षकांच्या  उपस्थित सुरु आहेत. मात्र या सामन्याची पोलिसांना खबरच  नसल्याने याठिकाणी कोरोना नियमावली पायदळी तुडवत सोशल डिस्टंसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.  ज्या महापालिकेकडे कोरोना रोखण्याची जबाबदारी आहे. त्याच प्रशासनाकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण दिले काय?  असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला  आहे. 

 

बंदिस्त प्रेक्षकगृहाचे  अर्धा शटर  बंद करून सामने .. 

 

           महाराष्ट्रासह देशात कोरोनाची तिसर्‍या लाटेची शक्यता  असताना राज्यात सरकराने कोरोना  नियमावली जाहीर केली आहे.  त्यातच ओमायक्रोनचा  धोकाही मोठ्या प्रमाणात वाढत आहे.  तर दुसरीकडे नवीन वर्षाच्या निमित्ताने गर्दी होऊ नये यासाठी राज्यसरकारने रात्री ९ ते सकाळी ६ वाजेपर्यत संचारबंदी घोषित केली आहे.  संचारबंदीत एका ठिकाणी ५ पेक्षा अधिक नागरिक एकत्र येऊ शकणार नाही.  यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाला आदेश काढण्यात आले.  जेणेकरून कोरोना सारख्या महाभयंकर आजाराला आळा घालता येईल. 


          परंतु राज्य सरकारने  दिलेल्या सर्व नियमांचे उल्लंघन करत भिवंडी महानगरपालिका अंतर्गत एका बंदिस्त प्रेक्षागृहामध्ये बिनधास्तपणे मध्यरात्रीच्या उशिरापर्यत  महापौर चषक कबड्डीचे आयोजन करण्यात आले आहे.  या कबड्डी स्पर्धेत मोठ्या संख्येने गर्दी होत असल्याने  सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला, तर कुणाच्या चेहऱ्यावरचा मास्क देखील नव्हता.  


        विशेष म्हणजे ही स्पर्धा बंदिस्त प्रेक्षाकगृहात अर्धा शटर  बंद करून सुरू होते. शिवाय याचे लाईव्ह चित्रीकरण थेट युट्युबच्या माध्यमातून दाखवले देखील जात होते.  मौलाना अब्दुल कलाम आज़ाद स्पोर्ट्स क्लबच्या वतीने कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून कोरोना नियमांची पायमल्ली या स्पर्धेत होत आहे. 

 

पोलिस कारवाई करतील का ?  


          दुसरीकडे पोलिसांचे म्हणणे आहे की, पाच पेक्षा अधिक लोक एकत्र दिसले तर त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल.  नवीन वर्ष घरात साजरे करा असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. मात्र भिवंडी-निजामपूर शहर महानगरपालिकेच्या बंदिस्त प्रेक्षागृहात बिनधास्तपणे मध्यरात्री नंतर देखील हजारोच्या गर्दीमध्ये महापौर चषक कबड्डी चे आयोजन धूमधडाक्यात सुरू आहे. असे असताना पोलीस कारवाई का करत नाही ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

Post a Comment

0 Comments