दुचाकीवर हेल्मेट घातल्याने तरुणाला मारहाण


कल्याण , कुणाल  म्हात्रे :-  दुचाकी चालवताना सुरक्षेच्या नियमाचे पालन करत हेल्मेट घालणे बंधनकारक असून हेल्मेट नसताना वाहनचालक पकडला गेल्यास त्याला ५०० रुपयाच्या दंडाची वाहतूक पोलीस अधिनियमात तरतूद आहे. मात्र कल्याणात एका २२ वर्षीय तरुणाला हेल्मेट घातल्याने अडवून चारचाकी चालकाने मारहाण करत त्यांचे हेल्मेट काढून फेकून देण्याचा प्रयत्न केला.


             त्याला शिवीगाळ केली या घटनेचा व्हिडीओ सदर तरुणाने यु ट्यूबवर शेअर करत याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात चारचाकी वाहनाच्या नंबर प्लेटद्वारे तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी याप्रकरणाची अद्यापि गंभीर दखल घेतलेली नसली तरी अशा प्रकारे नियमाचे उल्लघन करणाऱ्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे मत नागरिकाकडून व्यक्त होत आहे.


           स्वप्नील साळुंखे हा तरुण काल मंगळवारी दुपारच्या सुमारास अगरवाल कॉलेज रोडकडून कल्याणच्या दिशेने येत असताना त्याला रस्त्यात थांबवून एका चारचाकी वाहन चालकाने त्याला शिवीगाळ करत या परिसरात हेल्मेट घालून गाड्या चालविण्यात परवानगी नाही. 


         हेल्मेट काढ असे दरडावले. पण आपण नियमानुसार हेल्मेट घातल्याचे सांगत या तरुणाने हेल्मेट काढण्यास नकार देताच संतापलेल्या चारचाकी चालकाने गाडीतून उतरून त्या तरुणाला मारहाण करत त्याचे हेल्मेट जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला त्याचा मोबाईल देखील त्याने काढून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर या तरुणाने स्वताची कशीबशी सुटका करून घेत याप्रकरणी खडकपाडा पोलिसात सदर वाहनचालकाच्या गाडी नंबरसह तक्रार दाखल केली आहे.

 
           दरम्यान हि घटना तरुणाच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याने हा संपूर्ण व्हिडीओ यु ट्यूबवर शेअर करत हि दादागिरी कधी थांबणार असा सवाल केला आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने पाटील यांनी या घटनेची माहिती घेत कारवाई केली जाईल असे सांगितले.


            दरम्यान कल्याण पश्चिमेकडील गांधारी पुला कडून कल्याणच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर कायमच दादागिरी मारहाण करणाऱ्या गुन्हेगाराचा वावर असतो. या भागात यापूर्वी देखील अनेक तरुणांवर प्राणघातक हल्ले झाल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. यामुळे अशा गुंड प्रवृत्तीच्या गुन्हेगारावर वचक आणला जावा अशी मागणी नागरिकाकडून देखील होत आहे. 

Post a Comment

0 Comments