१५व्या केंद्रीय वित्त आयोगानुसार प्राप्त निधीच्या वितरण व विनियोग कामाचा महापालिका आयुक्तांनी घेतला आढावा


ठाणे , प्रतिनिधी  : १५ व्या केंद्रीय वित्त आयोगाच्या शिफारशीनुसार राज्यातील मिलियन प्लस सिटीज गटांतर्गत ठाणे शहराला मिळालेल्या प्राप्त अनुदानाचे शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार वितरण व विनियोग कार्यपध्दती निश्चित करणेच्या अनुषंगाने आज महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी आढावा घेतला. स्वच्छ हवा कृती आराखड्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिले.


          या आढावा बैठकीस अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे, उप आयुक्त मारुती खोडके, नगर अभियंता अर्जून अहिरे, उप नगर अभियंता विनोद गुप्ता, परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहरे मुख्य वित्त व लेखा अधिकारी दिलीप सूर्यवंशी, प्रदूषण नियंत्रण अधिकारी मनीषा प्रधान तसेच इतर अधिकारी आदी उपस्थित होते.


         स्वच्छ हवा कार्यक्रम व कृती आराखडा अंमलबजावणीसाठी या उपलब्ध निधीचे योग्य वितरण व विनियोग करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी संबंधितांना दिले आहेत.


         यावेळी या समिती मार्फत १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत हवेच्या दर्जामध्ये सुधारणा करण्यासाठी प्राप्त झालेल्या अनुदानाचा विनियोग महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व शासनाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार काटेकोरपणे करावा. मंजूर स्वच्छ हवा कृती आराखड्यानुसार हाती घेतलेल्या कामांच्या निविदा छाननी करुन मॉडेल टेंडर डॉक्युमेंट अंमलबजावणीसाठी संबंधित विभागाला देण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी संबंधितांना दिले.


        तसेच संबंधित विभागाकडून प्रस्तावाची अंमलबजावणी प्रभावीपणे होत असल्याबाबत विशेष दक्षता घेत शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीचा विनियोग मार्गदर्शक तत्वाप्रमाणे काटेकोरपणे होईल याची दक्षता घेण्याचे आदेशही महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले.


    शासनाकडून प्राप्त झालेल्या निधीच्या माध्यमातून शहरात इलेट्रीक बसेस, स्मशानभूमीचे अत्याधुनिकरण, धूळ नियंत्रण मशीन तसेच स्वच्छ हवा कृती आराखड्यानुसार इतर अत्यावश्यक कामे करण्यात येणार आहे. 


Post a Comment

0 Comments