मुस्लिम बहुल भागात मुलभूत सुविधांची वानवा मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी वेधले आयुक्तांचे लक्ष


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण पश्चिमेतील राव साहेब गोविंद करसन चौक ते जुना जकात नाका (वलीपीर रोड) या मुस्लीम बहुल भागात अंतर्गत रस्ते, मूलभूत सुविधांची वानवा असून याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र राज्य सचिव इरफान शेख यांनी पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांचे पत्राद्वारे लक्ष वेधले आहे.


           राव साहेब गोविंद करसन चौक ते जुना जकात नाका (वलीपीर रोड) या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आहे. याचे कारण हा मुख्य रस्ता असूनही सतत या रस्त्यावर झालेले दुर्लक्ष हेच आहे. तसेच सर्व अंतर्गत रस्त्यावर ही खड्डे आहेत. कल्याण मधील सर्वच प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटिकरण करण्यात आले परंतु या रस्त्याला त्यातून ही वगळण्यात आले. असे हेतुपुरस्सर करण्यात आले आहे असा आरोप इरफान शेख यांनी केला आहे.


            याला कारणीभूत तत्कालीन प्रकल्प अधिकारी किंवा शहर अभियंता जबाबदार आहेत. या रस्त्याच्या नावाचा उल्लेख जर तत्कालीन केंद्र सरकारला पाठवलेल्या डीपीआर मध्ये होता मग हा रस्ता काँक्रिटचा का झाला नाही ? याची चौकशी होणे ही गरजेचे आहे. हा संपूर्ण रस्ता मुस्लिम बहुल भागातून गेलेला असल्याने असे घडले का असा सवाल देखील इरफान शेख यांनी उपस्थित  केला आहे.

 
          मुस्लिम बहुल भागात मूलभूत सुविधा ही उपलब्ध नाही. सगळीकडे कचरा ,सांडपाणी वाहत असते. आता हा रस्ता एमएमआरडीएकडून येणाऱ्या निधीतुन होणार असे म्हंटले जात आहे. अंतर्गत रस्ते एका आठवड्यात नीट न केल्यास मोठे जन आंदोलन उभे करून आम्हाला न्याय मिळवावा लागेल असा इशारा देखील मनसेचे राज्य सचिव इरफान शेख यांनी पालिका आयुक्तांना दिला आहे.

Post a Comment

0 Comments