ब्रह्मांड कट्टयावर वीस महिन्यानंतर सुरु झाला प्रत्यक्षात हास्याचा खळखट्याक


ठाणे , प्रतिनिधी  : कोरोना काळातील मनावर साचलेले भयाचे मळभ व नीरसता क्षणात दुर  करण्यासाठी तब्बल २० महिन्याच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर सभागृहात कार्यक्रम सादर करण्याची परवानगी मिळाल्यानंतर 'हासू आणि आसू' हा  योगेश जोशी यांचा एकपात्री कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कोरोनानंतरचा पहिलाच कार्यक्रम असल्याने सांज स्नेह सभागृहातील उभारण्यात आलेल्या रंगमंचाची पुजा सांज स्नेह सभागृहाच्या सचिव सौ.सुनिला  वैद्य यांचे हस्ते करण्यात आली व‌ज्येष्ठ नागरीक संघाचे दिवंगत खजिनदार अरविंद दोंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. 


         तद्नंतर कट्टयाचे सुपरिचित गायक सावनकुमार सुपे यांच्या सुमधूर आवाजातील 'शिर्डीवाले साईबाबा' या सुंदर भजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. सुपे यांनी रसिकाना मोहवून ठेवले. लाॅकडाऊनमध्ये सार्वजनिक कार्यक्रमाना बंदी असल्याने ब्रह्मांड कट्टयाने ऑनलाईन कार्यक्रम आयोजित केले होते. या ऑनलाईन कार्यक्रमातून कट्टयाबरोबर जोडलेल्या हरहुन्नरी कलाकार सौ.ऋजुता देशपांडे यांनी 'मैत्री' ही छान कविता सादर केली. 


         ब्रह्मांड कट्टा नेहमीच परिसरातील नागरिकांमधील कलागुणांना वाव देतो व लोकामंध्ये असलेल्या सुप्त गुणांचा शोध घेवून  जगासमोर आपली कला सादर करण्याकरीता नेहमीच नवनवीन उपक्रम राबवतो. यांचा च एक भाग म्हणुन कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 'ब्रह्मांड नाट्य सिने फॅक्टरी' या नव्या संस्थेची स्थापना करण्यात आली. आनंद हर्डीकर यांच्या अध्यक्षतेखाली व टी. शांताराम यांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेमध्ये अभिनयाचे धडे दिले‌ जाणार आहेत.

 

           यानंतर प्रेक्षक ज्याची आतुरतेने वाट पाहत होते त्या मुख्य कार्यक्रमाची सुरुवात झाली. 'हासू आणि आसू' चे सादरकर्ते योगेश जोशी यांचा परिचय कट्टा अध्यक्ष महेश जोशी यांनी करुन दिला व सत्कार  राजेश जाधव यांनी  केला . योगेश जोशी यांनी मराठीचे सौंदर्य खुलवत हसता हसता अंतर्मुख करीत रोजच्या जगण्यातील विसंगतीवर बोट ठेवले व छोटे छोटे विनोदी किस्से सादर करत ताणतणाव विरहित आनंदी राहण्याची गुरुकिल्ली अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये उलगडली. 


           मनोरंजनातून प्रबोधनाचा नवा आदर्श ठेवत हसवत समाजातील दुर्लक्षिलेल्या घटकावर भाष्य करीत या समाजाला आपल्या बरोबर आणण्यासाठी खास प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे नमूद करीत समाजातील चुकीच्या प्रथेवर हसत हसत फटकारे ओढले. योगेश जोशी यांनी समाजातील शेवटच्या घटकामध्ये शिक्षणाबाबत असलेली आस्था दर्शविणारी 'आर्जव' ही कविता अगदी प्रभावीपणे  सादर केली .


             या कवितेनंतर सपुंर्ण सभागृह पुर्ण नि:शब्द झाले होते आणि रसिक प्रेक्षकांचेदेखील डोळे पाणावले. अशाप्रकारे हसता हसता डोळ्यात आसु आणुन या बहारदार कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments