जिल्ह्यासाठी २०२२-२३ करिता २१ हजार ८१३ कोटी रुपयांच्या संभाव्य बॅंक पतपुरवठा आराखड्यास मान्यता

■कृषी क्षेत्रासाठी १२९४ कोटींचा पत आराखडा १ जानेवारी पासून राष्ट्रीयकृत बॅंकांच्या कामकाजाच्या वेळा बदलणार...


ठाणे, दि.२४ (जिमाका) : ठाणे जिल्ह्यासाठी २०२२-२३ या वर्षा करिता २१ हजार ८१३ कोटी रुपयांच्या संभाव्य बॅंक पतपुरवठा आराखड्यास आज जिल्हा अग्रणी बॅंकेच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. पीक उत्पादन, विपणन यासाठी ३५६ कोटी, कृषी आणि संलग्न क्षेत्राच्या मुदत कर्जासाठी ४९४ कोटी, कृषीच्या पायाभूत सुविधांसाठी २८० कोटी पूरक बाबींसाठी १६२ कोटी असे एकूण कृषी क्षेत्रासाठी १२९४ कोटींचा पत आराखडा करण्यात आला आहे. 


          दरम्यान, जिल्ह्यातील राष्ट्रीय कृत बॅंकांच्या कामकाजाच्या वेळा ह्या कोरोनापूर्व काळात ज्याप्रमाणे होत्या तशा करण्यास जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी मान्यता दिली आहे. नविन वर्षांपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.


         जिल्हा अग्रणी बॅंकेची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समिती सभागृहात झाली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अंकुश माने, जिल्हा परिषदेच्या प्रकल्प संचालक छायादेवी सिसोदे, महाराष्ट्र बॅंकेच्या विभागीय व्यवस्थापक नर्मदा सावंत, अग्रणी जिल्हा प्रबंधक जे. एन. भारती, यांच्यासह विविध बॅंकांचे प्रतिनीधी उपस्थित होते.


         समाजातील वंचित घटकांसाठी पतपुरवठ्याच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ मिळवून देण्यासाठी बॅंकांनी वेळेवर पतपुरवठा करणे गरजेचे आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवून देताना बॅंका आणि विविध शासकीय यंत्रणा तसेच महामंडळे यांच्यात समन्वय ठेवून सर्व बॅंका, समन्वयक आणि शासकीय विभागप्रमुखांनी सक्रीय सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा नियोजन अधिकारी श्री. जाधव यांनी केले.


           यावेळी मान्यवरांच्या हस्ते २०२२-२३ संभाव्य पतपुरवठा आराखड्याचे प्रकाशन करण्यात आले. ठाणे जिल्ह्यासाठी २०२२-२३ या वर्षाकरीता कृषी क्षेत्राला १२९४ कोटी पतपुरवठ्याचे नियोजन करण्यात आले असून , सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योगांसाठी १६ हजार ८०३ कोटी, शिक्षण १९९ कोटी, गृहनिर्माण २४४० कोटी, सामाजिक पायाभूत सुविधासाठी बॅंक कर्ज १२३ कोटी, अन्य ५५८ कोटी रुपयांचा संभाव्य पतपुरवठा आराखडा करण्यात आला आहे. 


१ जानेवारी पासून राष्ट्रीयकृत बॅंकांच्या कामकाजाच्या वेळा बदलणार


         कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांच्या कामकाजाच्या वेळा सकाळी १० ते सायंकाळी ४ अशा करण्यात आल्या होत्या आता मात्र नविन वर्षांपासून या कामकाजाच्या वेळेत बदल होणार आहे. निवासी भागातील राष्ट्रीयकृत बॅंकेच्या शाखांसाठी सकाळी ९ ते सायंकाळी ४ (ग्राहकांसाठी सकाळी ९ ते दुपारी ३), वाणिज्य भागातील शाखांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ६ (ग्राहकांसाठी सकाळी ११ ते सायंकाळी ५) आणि अन्य भाग व कार्यालये असलेल्या ठिकाणच्या शाखांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ५ (ग्राहकांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ४) अशा बॅंकेच्या कार्यालयीन कामकाज वेळा ठरविण्यात आल्या असून त्याला जिल्हाधिकारी श्री. नार्वेकर यांनी मान्यता दिल्याचे या बैठकीत सांगण्यात आले.

Post a Comment

0 Comments