कामगारांच्या हक्कासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांचा पुढाकार ..


डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघातील नागरिक आणि नवी मुंबई महापालिकेमध्ये चतुर्थश्रेणी पदांवर कार्यरत असलेल्या कामगारांच्या न्याय हक्कासाठी सोमवारी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची भेट घेत 'समान काम समान वेतन' या नियमाची अंमलबजावणी करण्याची आग्रही मागणी केली.


         त्याचप्रमाणे कोविडच्या संकटात नागरिकांच्या सेवेसाठी जीव जोखमीत टाकून कार्यरत असणाऱ्या याच चतुर्थ श्रेणीतील कामगारांना हक्काचा बोनस मिळावा, अशीही मागणी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आयुक्त बांगर यांच्याकडे केली. यावर लवकरच दिलासा देण्याचे आश्वासन बांगर यांनी यावेळी दिले.


        नवी मुंबई महानगर पालिकेतील कंत्राटी कामगार महापालिकेच्या स्थापनेपासून महापालिकेत विविध विभागात कंत्राटी पद्धतीवर कार्यरत आहेत. एकूण कामगारांपैकी साधारण 1500 कामगार कल्याण लोकसभा मतदारसंघात वास्तव्यास आहेत. या कामगारांनी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन 'समान काम समान वेतना'ची मागणी निकाली काढण्याची विनंती केली होती. 


        त्यानुसार सोमवारी कल्याण लोकसभेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  ठाणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार राजन विचारे यांनी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार 'समान काम समान वेतन' या नियमाची अंमलबजावणी तातडीने करण्याची आग्रही मागणी यावेळी कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. शिंदे यांनी केली. तसेच कोविडच्या संकटात आपला जीव धोक्यात घालून कंत्राटी असलेल्या याच चतुर्थश्रेणी कामगारांनी सेवा दिली. 


        त्यामुळे या कर्मचाऱ्यांना हक्काचा कोविड भत्ता यासाठी पालिका प्रशासनाने तजवीज करावी, अशीही मागणी यावेळी डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केली. त्यावर बोलताना 'समान काम समान वेतन' लागू करणेसाठी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीची बैठक दोन दिवसात बोलवून त्वरित निर्णय घेण्यात येईल, असे आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. तसेच कोविड काळात काम करणाऱ्या कामगारांना सन्मानजनक वेतन वाढ देण्याचा प्रयत्न महापालिका करेल  असेही आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिले आहे. 


         चतुर्थश्रेणी कामगारांना कोविड भत्ता देण्यासाठी काही तांत्रिक अडचण भासल्यास याबाबत मंत्रालयात जिल्ह्याचे सन्माननीय पालकमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल अशी माहिती डॉ. श्रीकांत शिंदे यांनी दिली. तर नवी मुंबई महापालिकेतील सर्वच कामगारांना या निर्णयाचा फायदा होणार असल्याचेही डॉ. शिंदे यांनी दिली आहे. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, समाज समता कामगार संघाचे खजिनदार दादासाहेब निकाळजे, कल्याण उपसभापती भरत भोईर, हनुमंत ठोंबरे, गजानन भोईर, मंगेश लाड उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments