चर्मकारांचे ठामपा मुख्यालया समोर चूल मूल आंदोलन

 


ठाणे (प्रतिनिधी) - गटई व्यवसाय करणाऱ्या चर्मकारांच्या स्टाॅलवर ठामपाकडून वारंवार कारवाई होत असल्याच्या निषेधार्थ चर्मकार नेते राजाभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली ठामपा मुख्यालयासमोर चूल-मूल आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात शेकडो चर्मकार आपल्या कुटुंबियांसह सहभागी झाले होते. या आंदोलनकर्त्यांनी रस्त्यावरच चूल मांडून आपले अन्न शिजवले.  

 

       ठाणे शहरात अनेक ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने गटई स्टॉलला मान्यता दिली आहे. त्याच अनुषंगाने गोरगरीब चर्मकार रस्त्यावर कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही, या पद्धतीने आपला गटई व्यवसाय करीत आहेत. मात्र, दि. 8 डिसेंबरपासून नौपाडा-कोपरी प्रभाग  समिती, उथळसर प्रभाग समिती,वर्तकनगर प्रभाग समिती, माजीवडा-मानपाडा, कळवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या गटई स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे.  ठाणे शहरात अनेक स्टॉल ठाणे महानगर पालिकेने प्रमाणित केले आहेत. तर, अनेक स्टॉल्स हे राज्य शासनाच्या साामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेले आहेत. 


           शिवाय, शासनाने म्हणजेच सामाजिक न्याय खात्याने दिलेल्या स्टॉल्सवर कारवाई न करण्याबाबत ठामपाकडूनच सन 2015  मध्ये दिले होते. त्यानंतरही कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई थांबविण्यात यावी, या मागणीसाठी अनेकवेळा पत्रव्यवहार करण्यात आला होता. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. या संदर्भात अति. आयुक्त संजय हेरवाडे यांच्यासोबत सोमवारी चर्चादेखील करण्यात आली. मात्र, चर्चेत तोडगा न निघाल्याने चर्मकार समाज अंथरून , पांघरूणासह ठामपासमोर ठाण मांडून बसले. या ठिकाणी आंदोलकांनी चूल पेटवून अन्न शिजवले. 


        दरम्यान , ठाणे शहरातील सर्व गटई स्टॉलवरील कारवाई स्थगित करावी; ठाण्यातील गटई स्टॉलधारकांना पिच परवाना देण्यात यावा; परवानाधारक गटई स्टॉलच्या परवान्याचे नूतनीकरण करावे;  ठामपाचा परवाना नसलेल्या गटईस्टॉल्सला परवाने प्रदान करावेत, या मागण्यांसाठी आपण आंदोलन करीत आहोत. जर मागण्या मान्य झाल्या नाहीत तर हे सर्व चर्मकार बांधव मंत्रालयाच्या दिशेने कूच करतील, असा इशारा राजाभाऊ चव्हाण यांनी दिला. 


         राजाभाऊ चव्हाण यांच्यासह राजकुमार मालवी, संतोष अहिरे, सुभाष अहिरे, कैलास लोंगरे, कलिराम  मंडराई आदींसह शेकडो चर्मकार आपल्या कुटुंबियांसह सहभागी झाले आहेत.

Post a Comment

0 Comments