महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केली महिलेची जटेपासून मुक्तता


कल्याण , प्रतिनिधी : बाईच्या डोक्यात जट निर्माण झाली की तिला देवीच्याएखाद्या पीर बाबाच्या सेवेकरता सोडून द्यायचं असतं. तिने तिच्या सर्वसाधारण आयुष्याचा त्याग करायचा असतो अशाप्रकारे २१ व्या शतकात देखील रूढी आणि परंपरा यांच्या नावावरचं अंधश्रद्धां पसरवण्याचं काम सुरु आहे. अशाचप्रकारे एका महिलेच्या डोक्यात जटा वाढल्याने या महिलेचे जीवन असह्य झाले होते. या महिलेची महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी जटेपासून मुक्तता केली आहे.


शिवाजीनगर गोवंडी येथील रफिक नगर येथे राहणाऱ्या सकिना शेख या मुस्लिम महिलेच्या डोक्यात दोन वर्षांपूर्वी जट निर्माण झाली.  मग कुठल्यातरी फकीर बाबांनी तिला सांगितलं की ही जट काढू नको नाहीतर प्रकोप होईल. मागील दोन वर्ष तिच जगणं असह्य झालं होतं. डोक्यामधील ही जट तिला सुखाने झोपू पण देत नव्हती.  काहींनी ही जट काढण्याविषयी तिला सांगितले तर ती प्रकोप होईल या भीतीने काही काळ घरातूनच पळून गेली होती. ती घरी परत आलेली आहे असे समजतात महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्हाचे कार्यकर्ते  शाहीर स्वप्निल शिरसाट यांनी पुढाकार घेतला व तिचे समुपदेशन केले. योग्य समुपदेशन केल्यानंतर ती व तिचे कुटुंब हि जट काढण्यास तयार झाले.


ही जट निर्माण होण्यामागचे कारण त्यांना समजावून सांगितले. यामध्ये कुठल्याही देवाचा किंवा कुठला पीरबाबाचा  कोप नसतो हे समजावून सांगितले. त्यानंतर दिनांक २१ डिसेंबर २०२१ रोजी समितीच्या कार्यकर्त्यांना तिच्या डोक्यातील जट काढण्यात यश आलं. मागील दोन महिने सातत्याने शाहीर स्वप्निल शिरसाठ व त्यांचे सहकारी सोमनाथ राऊत संपर्कात राहून त्या महिलेचे व कुटुंबाचे प्रबोधन करत होते. सकीना शेख ही फक्त १८ वर्षाची आहे. या जटेमुळे डोक्याला असह्य खाज सुटणेझोप न येणे अशा अनेक समस्याना ती तोंड देत होती. जटेचं ओझं उतरल्यानंतर तिच्या चेहऱ्यावरचा आनंद खरंच पाहण्यासारखा होता तर दुसरीकडे एक चांगलं सत्कार्य आपल्या हातून घडलं याचा आनंद समितीच्या कार्यकर्त्यांना झाला होता.


केसांच्या अस्वच्छतेतून जट निर्माण होते. ग्रामीण भागातील महिला बऱ्याचदा केस विंचरत नाहीत. केसांची व्यवस्थित निगा न राखल्याने जट तयार होते. जट निर्माण होण्याचं हे खरे कारण आहे. पण एकदा जट तयार झाली की तशीच वाढू दिली जाते. देवीचा प्रकोप झाल्यानेच केसांत जट आली,अशी समाजात अंधश्रद्धा आहे. या अंधश्रद्धेपायी अनेकांची कुटुंब उदध्वस्त झाली आहेत. देवीचा प्रकोप वगैरे असे काही नसतं हे समजून घेण्याचीही त्यांची मानसिकता नसते. धर्म कुठलाही असला तरी शोषणाचे प्रकारत्याची दाहकता सर्वत्र तीच आहे. सर्वच धर्मातील महिला याला जास्त बळी पडतात. अतिशय चिकाटीने अशा बळी पडलेल्या व्यक्तीचे योग्य समुपदेशन करून त्यांना त्यातून बाहेर काढण्याचे काम आम्ही पुढे ही करत राहू असे शाहीर स्वप्नील शिरसाठ यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments