केडीएमसी क्षेत्रात परदेशातून आलेल्या ७६ जणांचा शोध सुरु


कल्याण, प्रतिनिधी  :  कोरोनाच्या ओमायक्रॉन या नव्या विषाणूचा धोका लक्षात घेता महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा दक्ष झाली असून गेल्या आठ दिवसांत केडीएमसी क्षेत्रात परदेशातून आलेल्या ७६ प्रवाशांचा आरोग्य विभागामार्फत शोध घेतला जात आहे. या प्रवाशांना कोरोनाची आरटी पीसीआर चाचणी करण्याच्या सूचना फोनद्वारे दिल्या जात आहेत.


          ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी सतर्क झालेल्या प्रशासनाकडून परदेशातून येणाऱ्या प्रवाशाची यादी प्रत्येक महापालीकेला पाठवली जात आहे. कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात २८ नोव्हेबर ते ३ डिसेबर या कालावधीत रशिया, शारजा, ओमान, सिंगापूर, मस्कत, युएई, सौदी अरेबिया, श्रीलंका, मास्को, साउथ कोरिया, स्वीडन, शिकागो, रशिया या देशातून ७६ नागरिक कल्याण डोंबिवलीत आले आहेत. 


         नियमानुसार परदेशातून आल्यानंतर या नागरिकांनी किमान ७ दिवस विलगीकरणात राहणे आवश्यक असताना देखील हे नागरिक राज्याच्या विविध भागात फिरत असल्याने असून या नागरिकांना विलगीकरणाच्या नियमाचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या नोंदीनुसार केंद्र आणि राज्य सरकारने दक्षिण आफ्रिकेतील बोटस्वाना आणि झिम्बाबे या देशातून येणाऱ्या नागरिकांना हायरिस्क जाहीर केले आहे. 


            तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका टाळण्यासाठी परदेशातून आलेल्या नागरिकाची करोना आरटीपीसीआर टेस्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहे. संबधित महापालिकेच्या मागणीनुसार मागील ८ दिवसात परदेशातून आलेल्या प्रवाशाची यादी आयसीएमआरकडून  पाठविण्यात  आली असून या यादीनुसार २८ नोव्हेबर पासून कल्याण डोंबिवलीत ७६ प्रवासी विविध देशातून दाखल झाले आहेत. 


          या प्रवाशाचा शोध पालिकेच्या आरोग्य विभागाकडून सुरु केला असता हे प्रवासी विलगीकरणाचा नियम मोडून राज्याच्या विविध भागात कामानिमित्त किंवा सुटीचा आनंद घेण्यासाठी फिरत असल्याचे आढळून आले आहे. या नागरिकाशी संपर्क करत ते असतील त्या महापालिकेच्या हद्दीत त्यांना करोना टेस्ट करून त्याचा अहवाल महापलिकेच्या आरोग्य विभागाकडे पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.


           मात्र यातील एखादा नागरिक जरी पोझीटीव्ह आला तर त्याच्या सम्पर्कातील नागरिकांना त्याची लागण होण्याची आणि त्यामुळे धोका वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान नागरिकांनी सामाजिक भान जपत करोना रोखण्यासाठी शासनाने आखून दिलेल्या नियमाचे पालन करण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने साथरोग प्रतिबंधक अधिकारी डॉ प्रतिभा पानपाटील यांनी केले आहे. 

Post a Comment

0 Comments