ठाणे (प्रतिनिधी) - ठाणे शहरात रस्त्यावर बसून गटई व्यवसाय करणार्या चर्मकार बांधवांवर वारंवार ठाणे महानगर पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे. त्यामुळे या गटई कामगारांची उपासमार होत आहे. ही कारवाई स्थगित करण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहारही करण्यात आलेला आहे. मात्र, ठाणे पालिकेचे काही अधिकारी जाणीवपूर्वक कारवाई करुन चर्मकारांची कोंडी करीत आहे.
त्या निषेधार्थ येत्या गुरुवारी (दि.23) सुमारे दीड हजार चर्मकार बांधव ठामपासमोर चूल आणि मूल आंदोलन करणार आहेत. तसेच, या आंदोलनानंतरही चर्मकारांच्या स्टॉल्सवरील कारवाई सुरुच ठेवल्यास ठाणे पालिका मुख्यालय ते मंत्रालय असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे, असे गटई कामगार नेते राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले.
गटई व्यावसायिकांवर होणार्या कारवाईच्या अनुषंगाने विचारविनिमय करण्यासाठी रविवारी ठाणे येथील शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस राजाभाऊ चव्हाण यांच्यासह राजकुमार मालवी, संतोष अहिरे, सुभाष अहिरे, कैलास लोंगरे, कलिराम मंडराई आदींसह सुमारे 200 ते 250 चर्मकार उपस्थित होते. या बैठकीमध्ये चर्मकारांच्या आंदोलनाची दिशा ठरविण्यात आली. या बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना राजाभाऊ चव्हाण यांनी हा इशारा दिला.
राजाभाऊ चव्हाण यांनी सांगितले की, ठाणे शहरात अनेक ठिकाणी सामाजिक न्याय विभागाने गटई स्टॉलला मान्यता दिली आहे. त्याच अनुषंगाने गोरगरीब चर्मकार रस्त्यावर कोणालाही अडथळा निर्माण होणार नाही, या पद्धतीने आपला गटई व्यवसाय करीत आहेत. मात्र, दि. 8 डिसेंबरपासून नौपाडा-कोपरी प्रभाग समिती, उथळसर प्रभाग समिती,वर्तकनगर प्रभाग समिती, माजीवडा-मानपाडा, कळवा प्रभाग समिती अंतर्गत असलेल्या गटई स्टॉल्सवर कारवाई करण्यात येत आहे. ठाणे शहरात अनेक स्टॉल ठाणे महानगर पालिकेने प्रमाणित केले आहेत.
तर, अनेक स्टॉल्स हे राज्य शासनाच्या साामाजिक न्याय विभागाने मान्यता दिलेले आहेत. शिवाय, शासनाने म्हणजेच सामाजिक न्याय खात्याने दिलेल्या स्टॉल्सवर कारवाई न करण्याबाबत ठामपाकडूनच लेखी स्वरुपात (क्र. ठामपा/अति. वि./उपआय/1451/दि. 7.10.2015) कळविलेले आहे. असे असतानाही सद्या कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी अनेकदा पत्रव्यवहार केला आहे.
शिवाय, आंदोलनेही केली आहेत. मात्र, त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या 23 डिसेंबर रोजी ठाण्यातील गटई व्यावसायिक मुलाबाळांसह ठामपा मुख्यालयासमोर चूल-मूल आंदोलन करणार आहेत. यावेळी पालिका मुख्यालयासमोर आंदोलक ठाण मांडणार असून दिल्लीच्या सिंघू बॉर्डरवर झालेल्या आंदोलनाप्रमाणेच येथेही अन्न शिजवण्यासह सर्व प्रकार करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
0 Comments