अ प्रभाग क्षेत्रात मुस्लिम समाजासाठी अंत्यविधी करिता दफनभूमीच नाही पालिकेचे नियोजित आरक्षणही नाही


कल्याण, प्रतिनिधी  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात भूखंडावर आरक्षण टाकून प्रशासनाने प्रत्यक्षात कागदोपत्री ताबा न घेता भूमाफियांनी मोकळ्या आरक्षित जागेवर टॉवर्स उभे करण्याचे धाडस दाखविले असतानाच "अ" प्रभाग क्षेत्रात राहत असणाऱ्या मुस्लिम समाजासाठी मृतांना दफन करण्यासाठी पालिकेची अधिकृत दफनभूमी नसल्याचे उघड झाले आहे.


कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या अ प्रभागात १० वॉर्ड येत असून किमान २० हजाराच्या आसपास मुस्लिम समाज वास्तव करीत आहे. वडवली, अटाळीमोहने शहरातील विविध विभाग तसेच बल्याणीआंबिवली आदी भागात विखुरलेला मुस्लिम समाज राहत असून मृतांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दफनभूमी नसल्याने मृतदेहाला ट्रक किंवा टेम्पोमध्ये दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या कल्याणात घेऊन जावे लागते. नागरिकांच्या दृष्टिकोनातून ही खर्चिक बाब असून अनेकदा ट्राफिक मध्ये दफनभूमीत पोहोचण्यासाठी दमछाक होते.


अंबिवली स्टेशन नजिक राहात असलेल्या इराणी समूहाला युतीच्या राजवटीत शिवसेनेचे तत्कालीन नेते व कामगारमंत्री साबीरभाई शेख यांनी आंबिवली-टिटवाळा रोड नजीक अधिकृत दफनभूमीची व्यवस्था करून दिली होती. मुस्लिम समाजाच्या चार ते पाच पिढ्यांचे विभागात वास्तव असतानाही परिवारातील कोणाचे निधन झाल्यास जवळपास दफनभूमी नसल्याने अंत्यसंस्कारासाठी दहा किलोमीटर जावे लागत आहे.


मोहने विभागातील जामा मस्जिदच्या ट्रस्टीनी  अनेकदा पालिका आयुक्तठाणे जिल्हाधिकारी ,तहसीलदार ,खासदारआमदार तसेच राज्याचे मुख्यमंत्रीविरोधी पक्षनेतेमहसूल मंत्री आदीकडे निवेदन देऊनही  दफनभूमी बाबत पोकळ आश्वासने देण्यात आले आहे. निवडणुकी दरम्यान सर्वच राजकीय पक्षांचे उमेदवार दफनभूमी बाबत आणाभाका देत दफनभूमीच्या प्रश्न सोडविण्याची खैरात वाटतात. 


मात्र निवडणूक गेल्यानंतर या महत्त्वाच्या प्रश्नाकडे ढुंकूनही पाहत नसल्याचे मुस्लिम समाजाचे नागरिक बोलत आहे. कल्याण डोंबिवली महानगर पालिकेला सर्वच प्रकारचा कर भरूनही पालिका प्रशासनाने दफनभूमी बाबत उदासीनतेची भूमिका स्वीकारली असल्याचा आरोप जामा मस्जिदचे आयुब खान यांनी केला आहे.


अ प्रभाग क्षेत्रातही काही आलबेल नसल्याचे स्पष्ट होत असून मोठया संख्येने राहात असलेला मुस्लिम समाजासाठी मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी दफनभूमीकरता आरक्षण टाकलेले दिसून येत नाही. कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे नगररचना विभागाचे नगररचनाकार रघुवीर शेळके यांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी दफनभूमीसाठी जागा आरक्षित केले नसल्याचे सांगितले आहे. 

Post a Comment

0 Comments