कोरोनाच्या पार्श्व भूमीवर ठाणे शहरात नवे कडक निर्बंध लागू नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महापौर व महापालिका आयुक्तांचे आवाहन


ठाणे , : ओमिक्रॉन व्हेरियंट व कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार ठाणे महानगरपालिका हद्दीत ३१ डिसेंबर २०२१ च्या रात्री १२:०० वाजेपासून नवे कडक निर्बंध लागू करण्यात आले असून यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांसह नवीन नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.


        या नव्या निर्बंधांमध्ये सार्वजनिक कार्यक्रम, लग्न सोहळे यांसाठीची उपस्थितीची मर्यादा ठरवण्यात आली असून यापूर्वी लागू केलेल्या निर्बंधांसह नवे निर्बंध कोरोचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आले आहेत. यामध्ये कोणत्याही बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या मैदानात संपन्न होणाऱ्या लग्न समारंभांसाठी उपस्थितांची मर्यादा १०० वरून ५० करण्यात आली आहे. कोणत्याही बंदिस्त ठिकाणी किंवा खुल्या मैदानात संपन्न होणाऱ्या धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक किंवा राजकीय कार्यक्रमांसाठी ही मर्यादा ५० करण्यात आली आहे. अंतिम संस्कारासाठी उपस्थितांची मर्यादा आता अधिकतम २० असणार आहे.


        ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील पर्यटक स्थळांवर, तलाव, क्रीडांगणे या सारख्या जास्त लोकांना आकर्षित करणाऱ्या ठिकाणी २४ डिसेंबरच्या आदेशानुसार लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह जमावबंदी (१४४ सी.आर.पी.सी. ) लागू करण्यात आले आहे. याशिवाय यापुर्वीच्या आदेशाप्रमाणे लागू असलेली सर्व निर्बंध पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. 


        या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा उल्लंघन केल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, साथरोग नियंत्रण अधिनियम आणि भारतीय दंड संहिता १८६० मधील तरतूदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.

Post a Comment

0 Comments