हरीयाणा येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुलींची कल्याण मधून सुटका कल्याण महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनची कामगिरी


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : हरीयाणा येथुन अपहरण झालेल्या २ अल्पवयीन मुलींची कल्याण मधून सुटका करण्यात पोलिसांना यश आले आहे. कल्याणच्या महात्मा फुले चौक पोलिसांनी हि सुटका केली आहे. विशेष म्हणजे हि माहिती मिळाल्यापासून अवघ्या दोन तासांतच या मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. 
 

          सोमवारी हरीयाणा राज्यातील नुह जिल्हातील सिटी तावडू पोलीस स्टेशनचे एएसआय जसविर सिंग यांनी महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे वपोनि. अशोक होनमाने यांना फोनद्वारे कळविले की, हरीयाणा राज्य येथुन २ अल्पवयीन मुली वय १५ वर्षे, व १८ वर्षे यांचे अज्ञात व्यक्तीने अपहरण केले असुन त्याबाबत सीटी तावडु पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अल्पवयीन मुली कल्याण येथे आल्याची माहीती मिळुन आली असुन तपास पथकाला कल्याण येथे पोहचण्यास वेळ लागणार आहे. तरी अपहरण झालेल्या मुलींचा शोध घेवुन त्यांना ताब्यात घ्यावे, अशी विनंती केली होती.


          अपहरण झालेल्या दोन्ही मुली अल्पवयीन असल्याने घटनेचे गांभीर्य ओळखुन वपोनि अशोक होनमाने यांनी हि माहीती पोलीस उप आयुक्त सचिन गुंजाळ, सहाय्यक पोलीस आयुक्त उमेश माने-पाटील यांना कळवुन अपहरण झालेल्या मुलींचा कल्याण परीसरात शोध घेण्यासाठी तात्काळ महात्मा फुले चौक पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाचे सपोनि दिपक सरोदे, पोहवा  भालेराव, मपोशि तिडके यांना योग्य त्या सुचना व मार्गदर्शन करुन पाठविले होते. 


        त्याप्रमाणे या पथकाने आपले सर्व कसब पणाला लावुन अतिशय दक्ष व चाणाक्षपणे कल्याण रेल्वे स्टेशन, एस.टी. स्टॅन्ड परीसर, मार्केट परीसरात अपहरण झालेल्या मुलींचा मिळालेल्या वर्णनांचे आधारे कसोशिने शोध घेतला असता अपहरण झालेल्या मुलींच्या वर्णनाप्रमाणे २ अल्पवयीन मुली लक्ष्मी भाजीमार्केट गेटसमोर भांबावलेल्या अवस्थेत आढळून आल्या. 


         महिला पोलीस अंमलदार यांचे मदतीने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे चौकशी केली असता त्या हरीयाणा राज्य येथुन अपहरण झालेल्या मुली असल्याचे निष्पन्न झाले आहे. हरीयाणा राज्य, सिटी तावडु पोलीस स्टेशनचे एएसआय जसविर सिंग हे महिला पोलीस अंमलदार व पोलीस पथकासह पोलीस ठाण्यात आले. 


         एएसआय जसविर सिंग यांचेकडील कागदपत्रांप्रमाणे पडताळणी केली असता ताब्यात घेण्यात आलेल्या दोन्ही अल्पवयीन मुली अपहरण झालेल्या मुलीच असल्याची खात्री करून कायदेशिर कारवाईने दोन्ही अल्पवयीन मुलींना सिटी तावडु पोलीस स्टेशनचे एएसआय जसविर सिंग यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments