सामाजिक - सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर ब्रह्मांड कट्टयाची सांस्कृतिक केंद्र व अँम्पी थिएटर उभारण्यासाठी मागणी


ठाणे, प्रतिनिधी : ब्रम्हांड कट्टा हे ठाण्यातील अग्रेसर सामाजिक व सांस्कृतिक मंडळ आहे. ठाणे शहराच्या सांस्कृतिक विकासामध्ये ब्रह्मांड कट्टयाचा मोलाचा वाटा आहे. आजवर ब्रह्मांड कट्टयाने अनेक कलाकार घडवले व घडवत आहे. तसेच नवनवीन कलाकारांसाठी ब्रह्मांड कट्टा हे एक मुक्त व्यासपीठ आहे. गेली चौदा वर्षे ब्रह्मांड कट्टयाच्या माध्यमातून विविध क्षेत्रात अनेक संस्था कार्यरत आहेत. 


        वाचन संस्कृती जपली जावी म्हणून ब्रम्हांड वाचक कट्टा, कलागुणांना वाव देणारे मुक्त व्यासपीठ ब्रम्हांड कलासंस्कार, संगीताची भूक भागवणारा ब्रम्हांड संगीत कट्टा, महिलांचे सबलीकरण व सक्षमीकरण व्हावे यासाठी कार्यरत ब्रम्हांड महिला परिवार संघ, नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करणारी व त्यासंबंधी उपक्रम राबवणारी संस्था ब्रम्हांड मॉर्निंग इवनिंग वॉकर्स क्लब अशा विविध स्तरांवर कार्यरत असलेल्या ब्रम्हांड कट्टयाच्या या संस्था उत्तुंग कामगिरी करत आहेत व त्यामुळे ब्रम्हांड कट्टयाचे नाव केवळ भारतातच नव्हे तर भारताबाहेरही वाखाणले जात आहे. 


         ब्रह्मांड तसेच आसपासच्या परिसरात लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत कलेची आवड असणारे व कला जोपासणारे अनेक लोक आहेत. या सर्व कलासक्त लोकांची कलेची भूक भागवण्यासाठी हक्काचे स्थान हवे असा ब्रहमांड कट्टयाचे संस्थापक राजेश जाधव यांचा मानस आहे  व त्यासाठी जाधव यांनी नुकतीच ठाणे शहराचे महापौर माननीय श्री नरेश म्हस्के यांची भेट घेतली. ब्रम्हांड परिसरात अँम्पी थिएटर तसेच कलादालन, वाचनालय, अभ्यासिका, इनडोअर आऊटडोअर गेम सुविधा, स्टुडिओ, पुरेशी आसन व्यवस्था असलेले प्रेक्षागृह यांनी परिपूर्ण असे सांस्कृतिक केंद्र उभारण्यासाठी सहकार्य करावे असा विनंतीवजा अर्ज जाधव यांनी महापौरांकडे सुपूर्द केला. याप्रसंगी उपमहापौर सौ पल्लवी कदम या देखील उपस्थित होत्या. 


      सामाजिक बांधिलकीची जाण, सामान्य जनतेच्या प्रगतीसाठी धडपड व उत्तम नेतृत्वाचे दर्शन घडविणारी दूरदृष्टी यामुळे ब्रम्हांड कट्ट्याचे संस्थापक राजेश जाधव यांच्या कार्याचा सर्वत्र दबदबा आहे. ब्रम्हांड मध्ये भव्यदिव्य असे सांस्कृतिक केंद्र उभारण्याचे त्यांचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल व ब्रम्हांड कट्ट्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाईल यात शंकाच नाही.

Post a Comment

0 Comments