केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे विरोधक शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषदेचे सभापती सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश..


भिवंडी दि 02(प्रतिनिधी )केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांचे राजकीय कट्टर विरोधक शिवसेनेचे माजी जिल्हा संपर्क प्रमुख तथा  ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम व आरोग्य समितीचे माजी सभापती  सुरेश म्हात्रे ( बाळ्या मामा ) यांनी आज  राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते  अजितदादा पवार  तसेच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील  , मंत्री हसन मुश्रीफ  यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.


             त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे,मे महिन्यात सुरेश म्हात्रे यांनी शिवसेनेचा राजीनामा दिला होता त्यामुळे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात उतरण्यासाठी मजबूत राजकीय पक्षाचा आढावा घेऊन अखेर काही दिवसापूर्वी शरद पवार यांची भेट घेऊन आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी सुरेश म्हात्रे यांनी हातावर घड्याळ बांधून राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अधिक मजबूत होणार आहे एवढे मात्र नक्की झाले आहे.


             कारण दोन वेळा लोकसभा निवडणुकीत  केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या  विरोधात उतरले होते त्यामुळे पुन्हा पाटील यांची डोकेदुखी वाढणार आहे,सुरेश म्हात्रे यांच्या  राष्ट्रवादीत  जाहीर प्रवेशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बोलताना सुरेश म्हात्रे कोणत्या  पक्षातून आलेत हे सांगताना  शिवसेनेचे नाव घेण्याचे मात्र टाळले आहे.सुरेश म्हात्रे  हे ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात महत्वाचे नाव असून केंद्रीय पंचायत राज राज्य  मंत्री कपिल पाटील यांचे कट्टर राजकिय विरोधक आहेत. 


             मधल्या काळात कपिल पाटील यांची केंद्रीय मंत्री पदी वर्णी लागल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांना राजकीय शह देण्यासाठी सुरेश म्हात्रे यांना राजकीय पाठबळ देणे हि ते ज्या पक्षात प्रवेश करणार त्या पक्षाची देखील गरज होणार होती . कारण मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात राजकीय भूमिका घेणारा एकही चेहरा सध्या ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण राजकारणात नाही. त्यातच मंत्री कपिल पाटील यांचा लोकसभा मतदार संघ हा भिवंडी असल्याने या मुस्लिम बहुल मतदार संघात पाटील यांच्या विरोधात काँग्रेस व राष्ट्रवादी बरोबरच ईतर पक्षांकडे देखील आजच्या घडीला चेहरा नाही.


            त्यामुळे बाळ्या मामा हे काँग्रेस मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत्या त्यामुळे  मतदार संघात रंगतदार चर्चा  सुरु होत्या . मात्र मे महिन्यात शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्या नंतर तब्बल सात  महिने सुरेश म्हात्रे यांनी आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली नव्हती मात्र  काही दिवसापूर्वीच सुरेश म्हात्रे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा असलेले शरद पवार यांची भेट घेतली आणि आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे महत्वाची बाब म्हणजे 2014 मध्ये  बाळ्या मामा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती त्यानंतर  2019 मध्ये  झालेल्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या विरोधात जाहीर बंड पुकारले होते.


          त्यामुळे शिवसेना,भाजप युतीच्या विरोधात काम केल्यामुळे सेना पक्षश्रेष्ठींनी बाळ्या मामा यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली होती. त्यावेळी कारवाई झाली तरी बेहत्तर मात्र कपिल पाटील यांना निवडणुकीत मदत करणार नाही अशी भूमिका सुरेश म्हात्रे यांनी घेतली होती. सध्या कपिल पाटील केंद्रीय मंत्री झाल्याने त्यांची राजकीय ताकद वाढली आहे तर दुसरीकडे आगामी लोकसभा निवडणुकीत कपिल पाटील यांच्या विरोधात कोणत्याही राजकीय पक्षाकडे चेहरा नसल्याने सुरेश म्हात्रे नेमकी कोणत्या पक्षात प्रवेश करणार याची उत्सुकता होती .


           मात्र  ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सेना , भाजप नंतर राष्ट्रवादीची देखील ताकद बऱ्यापैकी असल्याने त्यांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये जाहीर प्रवेश केल्याने राष्ट्रवादीला मोठी ताकद मिळणार आहे या आगोदर देखील   भिवंडी महापालिकेतील काँग्रेसचे तब्बल 18 नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळे शहरात राष्ट्रवादीची ताकद वाढली असताना आता ग्रामीण भागातही  बाळ्या मामा मुळे  राष्ट्रवादी वाढणार आहे..

Post a Comment

0 Comments