पत्नी व मुलावर हल्ला करुन पित्याची आत्महत्या


कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याणमधील एका हायप्रोफाईल सोसायटीत एका ५५ वर्षीय सेवानिवृत्त व्यक्तीचा मृतदेह सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. प्रमोद बनोरिया असे मयत व्यक्तीचे नाव असून त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. कुसुम बनोरिया असे पत्नीचे तर लोकेश बनोरिया असे मुलाचे नाव आहे. जखमी पत्नी व मुलाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी महात्मा फुले पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.कल्याण पश्चिमेकडील चिकनघर परिसरात निखिल हाईट्स ही हाय प्रोफाइल सोसायटी आहे. या सोसायटीत बनोरिया कुटुंब चौथ्या मजल्यावर वास्तव्यास आहेत. मयत प्रमोद बनोरिया हे सेवानिवृत्त मोटरमन आहेत. कौटुंबिक वादातून प्रमोद यांनी पत्नी आणि मुलाला जखमी केले आणि नंतर स्वतःला संपवलेअसे प्रमोद यांचा मुलगा लोकेशने पोलिसांना सांगितले. ही घटना रात्री घडली असावी असा पोलिसांचा अंदाज आहे.


लोकेश याने आज सकाळी सोसायटीच्या वाचमनला फोन करुन अॅम्बुलन्स पाहिजे असे सांगितले. मात्र वॉचमनला संशय आल्याने त्याने ही बाब सोसायटीतील इतर सदस्यांना सांगितली. सोसायटीतील लोकांनी घरी जाऊन पाहिले असता त्यांना धक्काच बसला. सोसायटीवाल्यांनी तात्काळ महात्मा फुले पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच महात्मा फुले पोलीस तात्काळ घटनास्थळी हजर झाले. पोलिसांनी घरात प्रवेश केला एक तरुण जखमी अवस्थेत पडलेला दिसला. आत जाऊन पाहिले असता एक महिलाही जखमी अवस्थेत दिसली तर दुसरीकडे एका इसमाचा मृतदेह पडलेला होता. घरात सर्वत्र रक्त पसरलेले होते.


पोलिसांनी जखमी मुलाकडे चौकशी केली असतावडिलांनी आम्हाला जखमी केलं त्यानंतर स्वतःला संपवलंअशी माहिती त्याने दिली. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ आणि एसीपी उमेश माने पाटील घटनास्थळी भेट दिली असून पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे. कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र तपासाअंती या प्रकरणातील तथ्य व काय घटना घडली हे समोर येईल. जखमींवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. त्यांची चौकशी झाल्यानंतर सत्य समोर येईल असं एसीपी उमेश माने पाटील यांनी सांगितले. 

Post a Comment

0 Comments