कोरोना काळात सामान्यांना एक आणि सेलिब्रेटींना दुसरा न्याय का?

निर्बंधांचे हनन करणार्‍यांवर गुन्हे दाखल करा- भैय्यासाहेब इंदिसे


ठाणे (प्रतिनिधी) -  कोरोनाच्या नियमांचा भंग करणार्‍या सामान्य नागरिकांकडून पाचशे रुपये दंड आकारण्यात येत आहे. मात्र, सेलिब्रेटींसाठी वेगळा नियम आहे का? ठाण्यात विवियाना मॉलमध्ये झालेल्या पांडू सिनेमाच्या पहिल्या शो साठी उपस्थित असलेल्या कलाकारांनी कोरोनाच्या नियमांचा भंग केला आहे. त्यांच्यावर कारवाई का केली गेली नाही, असा सवाल रिपाइं एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केला आहे. 


        ठाणे शहरातील विवियाना मॉलमध्ये शुक्रवारी पांडू या सिनेमाचा पहिला शो झाला. या वेळी भाऊ कदम, सोनाली कुलकर्णी, हेमांगी कवी, उदय सबनिस, सविता मालपेकर, प्राजक्ता माळी, कुशल बद्रीके, विजू माने यांच्यासह अनेक सेलिब्रेटींनी आनंदोत्सव साजरा केला. यावेळी एकाही सेलिब्रेटींने मास्क अथवा देहदुरीच्या (सोशल डिस्टन्स) नियमांचे पालन केले नाही.विशेष म्हणजे, मॉलमध्ये प्रवेश करण्यासाठी दोन लस घेणे सक्तीचे असताना एकाच्याही लसीकरणाच्या प्रमाणपत्राची पाहणी करण्यात आली नाही. 


               या कलावंतांनी दोन्ही लस घेतल्या असतीलही; पण, त्यांनी कोरोनासाठी लागू केलेल्या नियमांचे पालन केलेले नाही. एकीकडे सामान्य नागरिकाने मास्क न वापरल्यास त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र, या कलावंतांवर अशी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही. अनेकदा कलावंतांचे अनुकरण सामान्य  लोक करीत असतात. त्यामुळे येथेही असे अनुकरण झाले तर तिसरी लाट अटळ आहे. 


          त्यामुळे पुढच्यास ठेच, मागचा शहाणा या तत्वाने संबधित कलाकारांवर पँडामिक अ‍ॅक्टनुसार गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी भैय्यासाहेब इंदिसे यांनी केली आहे.  या संदर्भात इंदिसे यांनी वर्तक नगर पोलीस ठाण्यात निवेदनही दिले आहे.

Post a Comment

0 Comments