अण्णाभाऊंच्या नातीला घर; मातंग समाजाने मानले अशोक वैतींचे आभार

तळागाळातील समाजाचे प्रश्न प्रकर्षाने सोडविणार- अशोक वैती...

ठाणे (प्रतिनिधी)- अण्णा भाऊ साठे यांच्या नातीला ठाणे महानगर पालिकेच्या वतीने घर देण्यात आले आहे. या कामासाठी सभागृह नेते अशोक वैती यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले होते. त्याबद्दल मातंग समाजाचे नेते रमेश समुखराव, राजेश वैराळे यांनी ठामपा मुख्यालयामध्ये वैती यांचा सत्कार केला. यावेळी सत्काराला उत्तर देताना, दलित, शोषीत, ओबीसी समाजाच्या मागण्यांना न्याय देण्याचा प्रयत्न आपण कायमस्वरुपी करीत राहू, असे आश्वासन अशोक वैती यांनी दिले. 


       अण्णा भाऊ साठे यांची नात ज्योती साठे यांना ठाणे महानगर पालिकेच्या सेवेत सन 2009 मध्ये रुजू करुन घेण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या घराची अडचण होती. ही अडचण दूर करण्याच्या उद्देशाने मातंग समाजाचे नेते रमेश समुखराव, राजेश वैराळे यांच्यासह अनेकांनी पत्रव्यवहार केला होता. ही बाब ओबीसी नेते अशोक वैती यांना समजताच त्यांनी महापौर नरेश म्हस्के यांच्याशी चर्चा करुन महापौरांच्या साह्याने हा प्रश्न मार्गी लावला. ज्योती साठे यांना ठामपाच्या वतीने घर देण्यात आले आहे. या बद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी अशोक वैती यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले. 


         यावेळी ओबीसी नेते अशोक वैती यांनी, “साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्याचे धोरण पालिकेच्या वतीने राबविण्यात आले होते. त्यांच्या वारसांना ठामपाच्या सेवेत सामावून घेतले होते. जयंती साजरी करताना काही सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानुसार त्या सूचना मान्य करुन अण्णा भाऊ साठे भवन बांधण्याचे प्रस्तावित केले होते. ते काम आता अंतिम स्तरावर आले आहे. लवकरच हे काम पूर्णत्वास जाणार आहे. 


        त्याबद्दल मातंग समाजाच्या प्रतिनिधींनी आपले आभार मानले आहेत. मात्र, आभार मानण्याऐवढे काम आपण केलेले नाही. कारण, ते आपले कर्तव्यच आहे. किंबहुना, दलित, शोषीत, ओबीसी समाजाच्या मागण्या या त्यांच्या अधिकार आहेत. आपण त्याची परिपूर्ती करण्यासाठी पुढाकार घेऊ , असे आश्वासन दिले.

Post a Comment

0 Comments