केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत आरोग्य केंद्रांची स्थापना करा अधिवेशनाच्या शून्य प्रहरात खा. डॉ. शिंदे यांची मागणी

■कल्याण-डोंबिवलीसह ठाकुर्ली, दिवा, कळवा, मुंब्र्यातील लाभार्थ्यांना मिळणार सुविधा 

डोंबिवली  ( शंकर जाधव ) केंद्र सरकारच्या आरोग्य योजनेचा लाभ घेणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आदी लाभार्थ्यांची संख्या कल्याण लोकसभा मतदारसंघात मोठी असून यामध्ये सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसह लहान मुले, महिला आणि वृद्ध देखील आहेत. या आरोग्य योजनेंतर्गत मुंबई विभागीय क्षेत्रात एकूण 26 आरोग्य सेवा केंद्र आणि ओपीडी आहेत. 


         परंतु कल्याण लोकसभा मतदारसंघ हा मुंबई महानगर क्षेत्रात येत असूनही अश्याप्रकारचे एकमेव आरोग्य केंद्र अंबरनाथ येथे आहे. त्यामुळे या मतदासंघातील इतर लाभार्थ्यांना उपचारासाठी मुंबईला जावे लागते. त्यामुळे त्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते. तसेच यामुळे मुंबईतील CGHS केंद्रावर मोठा ताण पडत असल्याची बाब सभागृहासमोर मांडत कल्याण अथवा डोंबिवलीत (CGHS) आरोग्य केंद्र सुरु करण्याची आग्रही मागणी बुधवारी अधिवेशनाच्या शून्य प्रहरात केली. 


       केंद्र सरकारच्या आरोग्ययोजनेंतर्गत (CGHS) येणाऱ्या केंद्रीय कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय आदी लाभार्थ्यांना आरोग्य सेवा पुरविल्या जात असून सद्या 12 लाख प्राथमिक कार्डधारक आणि 37 लाख लाभार्थी आहेत.मुंबईच्या CGHS आरोग्य केंद्रात कल्याण-डोंबिवलीसह ठाकुर्ली, दिवा, कळवा, मुंब्र्यातील लाभार्थ्यांना जावे लागत असल्याने बरेच लाभार्थी या योजनेचा लाभ घेण्यापासून वंचित राहत आहेत. पर्यायाने त्यांना उपचारासाठी खासगी आरोग्य केंद्र वा रुग्णालयात जावे लागते. तेथील उपचारासाठीचा खर्च मोठा असल्याने या सर्वसामान्य लाभार्थ्यांच्या खिशावर देखील मोठा ताण पडत असल्याचे यावेळी स्पष्ट केले.


         कल्याण लोकसभा मतदारसंघातील कल्याण अथवा डोंबिवली येथे CGHS आरोग्य केंद्राची स्थापना झाल्यास या मतदारसंघातील कल्याण, डोंबिवली, ठाकुर्ली, दिवा, कळवा आणि मुंब्रा भागातील लाभार्थी असलेल्या सेवानिवृत्त कर्मचारी, लहान मुले, महिला आणि वृद्धांचा उपचारासाठी मुंबईला जाण्यासाठी लागणारा वेळ, त्रास आणि पैसा वाचेल. तसेच या केद्रांत सुरळीत आणि योग्य प्रकारे आरोग्य सुविधा मिळतील, याकडेही खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सभागृहाचे लक्ष वेधले.

Post a Comment

0 Comments