पार्कोफिन क्रिकेट क्लबला विजेतेपद

 


ठाणे , प्रतिनिधी  : पार्कोफिन क्रिकेट क्लबने दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनचा ६ विकेट्सनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवेज्ञ क्रिकेट क्लब आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी -२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. 


          सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या विजेतेपदाच्या लढतीत दिलीप वेंगसरकर फाऊंडेशनने प्रथम फलंदाजी करत २० षटकात ४ बाद ११३ धावा केल्या. साखळी लढतीत संघाला अंतिम फेरीचा मार्ग  मोकळा करून देताना नाबाद अर्धशतकी खेळी करणाऱ्या मंजिरी गावडेने या सामन्यातही छाप पाडताना सहा चौकारानिशी ४७ धावा करत मोलाचे योगदान दिले, याशिवाय स्पर्धेत सातत्यपूर्ण फलंदाजी करणाऱ्या सानिका चाळकेने यावेळी ३४ धावा केल्या. 


         तर सिमरन शेखने २२ धावा केल्या. सायली सातघरेने १४ धावात २, सायमा ठाकोर आणि परिशिका नाईकने प्रत्येकी एक विकेट मिळवली. या मर्यादित धावांचा पाठलाग करताना पार्कोफिन क्रिकेट क्लबची सुरुवात खराब झाली होती. अवघ्या एक धावसंख्येवर पहिला फलंदाज गमावणाऱ्या पार्कोफिन क्रिकेट क्लबला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीस आलेल्या वृषाली भगतने तारून नेले. स्पर्धेत चांगली फलंदाजी करत आपल्याकडे लक्ष्य वेधून घेणाऱ्या वृषालीने संयमी फलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला. 


          वृषालीने ५० चेंडूत चार  चौकारांसह नाबाद ४१ धावा केल्या, सायली सातघरेने नाबाद ३१ आणि सलोनी कुष्टेने १६ धावा केल्या. पार्कोफिन क्रिकेट क्लबने १८.२ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात ११४ धावा करत विजयावर शिककमोर्तब केले. वृषाली भगतला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देण्यात आला. 


संक्षिप्त धावफलक

दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन : २० षटकात ४ बाद ११३ (मंजिरी गावडे ४७, सानिका चाळके ३४, सिमरन शेख २२, सायली सातघरे ४-१४-२, सायमा ठाकोर ४-२५-१, परिशिका नाईक ३-२५-१) ६ विकेट्सनी पराभूत विरुद्ध पार्कोफिन क्रिकेट क्लब : १८.२ षटकात ४ बाद ११४ ( वृषाली भगत नाबाद ४१, सायली सातघरे नाबाद २१, सलोनी कुष्टे १६, रेश्मा नाईक ४-२४-१, मनाली दक्षिणी ३.२ -११ - १, सानिका चाळके ४-११-१)

स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू 

सर्वोत्तम फलंदाज- राधिका ठक्कर (दहिसर स्पोर्ट्स क्लब), सर्वोत्तम गोलंदाज- बतुल परेरा (दहिसर स्पोर्ट्स क्लब), सर्वोत्तम क्षेत्ररक्षक - सिमरन शेख ( दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन), सर्वोत्तम खेळाडू - सानिका चाळके (दिलीप वेंगसरकर फाऊंडेशन, एकूण १७४ धावा आणि ५ विकेट्स) 

Post a Comment

0 Comments