कोमसापच्या युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रणव सखदेव यांना साहित्य अकादमी युवा पुरस्कार

काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार - साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या लेखकाला ऐकण्याची ठाणेकरांना संधी...


ठाणे, प्रतिनिधी  : आजच्या पिढीचे जगणे, तिचे मनोविश्व, तिचे प्रश्न यांची स्पंदने टिपणाऱ्या आशयघन कथा-कादंबऱ्या लिहिणारे युवा लेखक प्रणव सखदेव यांना वर्ष 2021 साठीचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार गुरुवारी जाहीर झाला. युवा पिढीची मनाला चटका लावणारी गोष्ट सांगणाऱ्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झालेले प्रणव सखदेव 11 व 12 जानेवारी, 2022 रोजी ठाण्यात होणाऱ्या कोमसाप युवा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असून त्यांचे साहित्य-समाजविषयक चिंतन ऐकण्याची संधी यानिमित्ताने ठाणेकर साहित्यप्रेमींना मिळणार आहे.


            कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे दुसरे राज्यस्तरीय युवा साहित्य संमेलन ठाण्यातील काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात 11 व 12 जानेवारी रोजी संपन्न होणार आहे. विविध साहित्यविषयक कार्यक्रमांबरोबरच सामाजिक-सांस्कृतिक विषयांवरील परिसंवादांची रेलचेल असलेल्या या संमेलनाच्या अध्यक्षपदी युवा लेखक आणि गुरुवारी जाहीर झालेल्या साहित्य अकादमी युवा पुरस्काराचे मानकरी प्रणव सखदेव यांची निवड करण्यात आली आहे. 


           नव्वदोत्तर पिढीच्या अस्वस्थ वर्तमानाचा पट मांडणाऱ्या या लिहित्या आणि आता साहित्य अकादमी युवा पुरस्काराने गौरविलेल्या लेखकाची मुलाखत कोमसापच्या युवा साहित्य संमेलनात घेतली जाणार आहे. युवा पिढीची स्पंदने टिपू पाहणाऱ्या नव्या वर्षातील या पहिल्याच व्यापक संमेलनातील अध्यक्षीय मुलाखतीत प्रणव सखदेव साहित्यातील कथनात्मक आणि काव्य प्रवाह, त्यांची निर्मितीप्रक्रिया, तसेच समाजातील घडामोडींचा त्यावर पडणारा प्रभाव यांविषयीचे चिंतन मांडतील. 


           मुळचे कल्याणचे असलेल्या प्रणव सखदेव यांनी मुंबईतल्या रुईया महाविद्यालयात शिक्षण घेऊन काहीकाळ पत्रकारिताही केली. सध्या ते पूर्णवेळ प्रकाशन क्षेत्रात संपादक म्हणून कार्यरत आहेत. याआधी त्यांची ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ (कवितासंग्रह), ‘नाभीतून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य’, ‘निळ्या दाताची दंतकथा’ (कथासंग्रह), ‘९६ मेट्रोमॉल’ (कादंबरी) या पुस्तकांबरोबरच बालसाहित्यातील आणि विविध अनुवादित पुस्तकेही प्रसिद्ध झाली आहेत. 2019 साली सखदेव यांची ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ ही पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली. 


        महाविद्यालयात शिकणाऱ्या तीन युवक-युवतींच्या जगण्याचा कोलाज मांडणारी ही कांदबरी दशकभरापूर्वीच्या काळात घडते आणि फ्लॅशबॅक पद्धतीने त्यातली कथा वाचकापुढे उलगडत नेते. मैत्री, प्रेम, तिरस्कार, तडफड, मृत्यू, नियतीने उद्ध्वस्त करणे, माणसाच्या आत्मघातकीपणा आणि एकाकीपणाबद्दलची ही कथा डिजिटल जगातल्या उदासिनतेचे पदर मांडणारी आहे. मुंबईतील विविध ठिकाणे, मुंबईचा पाऊस आणि पूर, मुंबईवर झालेला 26/11 चा दहशतवादी हल्ला अशा अनेक घटना या कादंबरीत डोकावतात. त्यामुळेच सखदेव यांच्या या कादंबरीत वर्तमानाचा सूर उमटला आहे.

...........................

आनंद आणि अभिमान


       “महाविद्यालयीन जीवनातील तरुणांचे भावविश्व मांडणाऱ्या ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ या कादंबरीसाठी प्रणव सखदेव यांना यंदाचा साहित्य अकादमी युवा पुरस्कार मिळाला, याचा आनंद आहे. असा आजच्या पिढीचा आश्वासक लिहिता लेखक कोमसापच्या युवा साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असणार आहे, याचा आम्हाला अभिमान वाटतो. वर्तमानाशी नाळ तुटू न देता आशयघन साहित्य लिहिणारे प्रणव सखदेव यांचे चिंतनगर्भ विचार संमेलनातील त्यांच्या मुलाखतीत ऐकण्याची संधी ठाणेकरांना मिळणार आहे.”


-डॉ . प्रदीप ढवळ, कार्याध्यक्ष, कोकण मराठी साहित्य परिषद

Post a Comment

0 Comments