अभिनय कट्ट्यावर ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षकांनी सादर केले अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली हे मुकनाट्य :


ठाणे, प्रतिनिधी  :  स्त्रियांवर होणारे अत्याचार सर्वश्रुत आहेत. त्याचप्रमाणे दिव्यांग महिलांचे होणारे शारीरिक शोषणसुद्धा महत्वाचा विषय आहे. कायदे जरी कठोर झाले तरीही बलात्कार आजही होतोच आहे. याची वेगवेगळी कारणं आहेत. यावर भाष्य करणारे व याला उत्तर कसे द्यावे याकरिता मार्गदर्शन करणारे मुकनाट्य अभिनय कट्ट्यावर सादर करण्यात आले. ठाणे महानरपालिकेच्या शिक्षण विभागातील विशेष मुलांच्या शिक्षिका व त्यात मुख्य भूमिकेतील एक दिव्यांग विद्यार्थिनी यांनी हे सादरीकरण केले. यासाठी किरण नाकती यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.


         हे सादरीकरण बघितल्यावर उपस्थित रसिक प्रेक्षक भावूक झाले. त्यांनी सर्वांचं कौतुक केलं.एका दहा वर्षाच्या दिव्यांग मुलीच्या वाढदिवसानिमित्त जमलेल्या मित्रपरिवारामध्ये एक नराधम जो त्यामुलीसोबत अंगलट करत चुकीचे स्पर्श करतो व जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत विनयभंग करतो. हि गोष्ट तिच्या आईच्या लक्षात येताच शांत न रहाता त्याला पोलिसांच्या ताब्यात देऊन या विषयावर आवाज उठवते व असा स्पर्श करण्याचा कुणी प्रयत्न केल्यास त्याला प्रत्युत्तर कशाप्रकारे द्यावे यासाठी समुपदेशन व इतर उपाय  दाखवण्याचा प्रयत्न या मुकनाट्याद्वारे करण्यात आला. 


सरला  जगताप,अक्षता  लेले,मीनाक्षी  जाधव,प्रमिला म्हात्रे,मानसी भोसले, संजीवनी  सातपुते,कल्याणी नलावडे लता  चव्हाण,आसाराम दोडके, आर्येन वाघ  या सर्वच शिक्षक कलाकारांनी व  व दिव्यांग विद्यार्थीनी आकांशा गायकर यांनी आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली व हा समाजप्रबोधनाचा कठीण विषय सोप्या पद्धतीने लोकांपर्यंत पोहोचवला.त्यानंतर या विषयावरील चर्चासत्र घेण्यात आले.त्यात दिग्दर्शक किरण नाकती,शिक्षिका  सरला महाजन, अक्षता लेले, दिव्यांग कला केंद्राच्या संचालिका संध्या नाकती यांनी भाग घेतला. राजन मयेकर यांनी यांना या विषयावरील प्रश्न विचारून बोलतं केलं.


          आज समाजात या दिव्यांग मुलींसोबत अशा प्रकारच्या घटना घडत असतात. त्यांना योग्य ते प्रशिक्षण देणं खूप गरजेचं असतं ते प्रत्येक पालकांनी तसेच ती मुलं ज्या ठिकाणी शिकतात तेथील शाळा,केंद्र यांच्यामार्फत समुपदेशन होणं गरजेचं आहे. या विकृत मानसिकतेला ठेचणं गरजेचं आहे.त्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेतला पाहिजे. प्रत्येक आईने जिजाऊ होऊन आपल्या घरात शिवबा घडवणं गरजेचे आहे. 


        ज्यादिवशी यासाठी पुढाकार घेणारा महाराष्ट्रातील प्रत्येक मी तयार होईल तेव्हाच मानसिकता बदलेल.यासाठी पुढाकार घेऊन एक चळवळ उभी करू व लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला समुपदेशन करण्यासाठी पुढाकार घेऊ असे मत किरण नाकती यांनी व्यक्त केले.

Post a Comment

0 Comments