डोंबिवली महिला महासंघ संपर्क डायरी २४×७ चा प्रकाशन समारंभ


डोंबिवली ( शंकर जाधव ) भारतीय स्त्री जीवनातील वर्तमान वळणावर उभे राहून वर्तमानाचे गतीमान विश्लेषण आणि कृतीशील कार्यक्रमाचे संचलन करून डोंबिवली महिला महासंघाने समाज सबलीकरणाच्या दिशेने एक खंबीर पाऊल उचलून डोंबिवली महिला महासंघ संपर्क डायरी २४×,७ या डायरीची निर्मिती केली आहे.


           डोंबिवली महिला महासंघ संपर्क डायरी २४×७ चा प्रकाशन समारंभ नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बालरोगतज्ज्ञ डॉ. उल्हास कोल्हटकर, महिला महासंघाच्या अध्यक्ष डॉ. विंदा भुस्कुटे महिला महासंघाच्या संस्थापक अध्यक्ष व कार्यवाह सी.ए.जयश्री कर्वे व्यासपीठावर उपस्थित होते. 


       डोंबिवली महिला महासंघ ही महिलांच्या सक्षमीकरण व विकासासाठी कार्यरत असलेली महिला संस्थांची संघटना आहे. या महासंघात विविध स्तरावर कार्यरत असलेल्या आठ महिला संस्था समाविष्ट आहेत.आम्ही आतापर्यंत विविध कार्यक्रम केलेले असून संपर्क डायरी हा आमचा उपयुक्त व महत्त्वाचा उपक्रम आहे.महिलांचे संरक्षण व विकास हे आमचे ध्येय आहे.


         डॉ. कोल्हटकर म्हणाले, डोंबिवली महिला महासंघाने महिला, बालक.व जेष्ठ नागरिक यांच्यासाठी १३ कायदे व १३ सरकारी योजनांची उपयुक्त माहिती तसेच बालगृह, निरीक्षणगृह,बालविकास प्रकल्प इ.ची महत्वपूर्ण माहिती या डायरीत दिलेली आहे. ती अत्यंत मोलाची व प्रशंसनीय आहे. पुरुषप्रधान संस्कृती, शिक्षणाचा अभाव,योग्य आरोग्य सेवा उपलब्ध न होणे. लिंगभेद,समान वेतन नसणे, बलात्कार, हुंडाबळी या समस्यांना महिलांना सामोरे जावे लागते याची खंत वाटते. 


       पण यासाठीच महिला महासंघाने या संपर्क डायरीच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे. आणि सामाजिक बांधिलकी कृतीत उतरवलेली आहे.ही डायरी महिला संस्थांना निश्चितच उपयोगाची आहे.डायरीचे प्रकाशन झाल्यावर अँड. शशांक देशपांडे, मानसोपचारतज्ञ डॉ. अद्वैत पाध्ये, भाग्यश्री बच्छाव, अँड पल्लवी इ. मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. तर समारोप करताना डॉ. विंदा भुस्कुटे म्हणाल्या. 


        समविचारी महिला संस्थाना एकत्र आणून काम करणे ही अवघड गोष्ट आम्ही साध्य केलेली आहे. महिला काय काम करू शकतात हे पुरूषांनी डोळसपणे बघायला हवे. ही तर सुरुवात आहे. अजून आम्हाला बरेच उपक्रम करायचे आहेत. महिलांचे आत्मभान जागृत करायचे आहे.


        या कार्यक्रमात काही उपस्थित मान्यवरांचे सत्कार व सभासदांची ओळखही करून देण्यात आली.यानंतर सुनिती रायकर यांनी आभारप्रदर्शन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली काळे व प्रास्ताविक जयश्री कर्वे यांनी केले.पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment

0 Comments