भाजपा तर्फे असंघटीत कामगारांसाठी मोफत ई-श्रम स्मार्ट कार्ड शिबिर


डोंबिवली ( शंकर जाधव )  कल्याण डोंबिवली महानगरपालिका अंतर्गत समाविष्ट असणाऱ्या सांगाव, नांदीवली, देसलेपाडा येथील दुर्लक्षित असलेल्या असंघटित कामगारांसाठी भाजपचे जिल्हा उपसचिव सचिन मात्रे यांनी मोफत ई-श्रम स्मार्ट कार्ड शिबीर आयोजित केले होते. या शिबिराला कामगारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अर्ज नोंदणीसाठी कामगारांनी गर्दी केली होती.


       मानपाडा शंखेश्वरनगर, डोंबिवली पूर्व येथील शांताराम सदन पटांगणात शनिवार आणि रविवार असे दोन दिवस हे शिबिर होत आहे. या शिबिराचा फायदा असंघटित कामगारांना मिळत आहे.याबाबत सचिन मात्रे यांनी सांगितले की, शिबिरात लहान शेतकरी, शेतमजूर कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाले, मच्छी विक्रेते, वीटभट्टीवर काम करणारे, सफाई कामगार आदि असंघटित लाभार्थ्यांनी अर्ज केले आहेत. कर्जदारांकडून श्रमिक कार्डसाठी आवश्यक ती कागदपत्रे घेऊन त्यांची नोंदणी करण्यात आली आहे. 


        श्रमिक कार्डमुळे असंघटित कामगारांची शासन दरबारी नोंद होणार असून लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळेल. विशेष म्हणजे श्रमिक कार्ड योजना धारकांना प्रधानमंत्री सुरक्षा योजनेचा लाभ मिळणार आहे. श्रमिक कार्ड माध्यमातून कामासाठी लागणारे साहित्य, स्वयंरोजगारासाठी सहायता, घरबांधणीसाठी आर्थिक मदत, शिक्षण सहायता, मुलींच्या लग्नासाठी आर्थिक मदत, वीजबिल सबसीडी,उपचारासाठी खर्च आदी लाभ मिळणार आहेत.


      सदर ई-श्रम स्मार्ट कार्ड शिबीर आयोजनसाठी प्रकाश पाटील, संजय राणे, अजय पाटील, निरंजन जोशी, समीर शेख, स्वप्निल महाडिक यांनी विशेष मेहनत घेतली. ई-श्रम स्मार्ट कार्ड साठी आवश्यक कागदपात्रांची पूर्तता झालेल्या अर्जदारांना शुक्रवार दिनांक 31 डिसेंबर रोजी "ई-श्रम स्मार्ट कार्ड"चे वाटप करण्यात येणार असल्याचेही सचिन म्हात्रे यांनी सांगितले.

Post a Comment

0 Comments