आरटीओ कार्यलयात थुंकण्यास मज्जाव करणाऱ्या कर्मचाऱ्याला एजंटने केली मारहाण

■पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केल्याने संतप्त कर्मचाऱ्यांचे लेखणी बंद आंदोलन , गुन्हा दाखल करण्यासह कठोर कारवाई करण्याची मागणी...


कल्याण, कुणाल म्हात्रे  : आर.टी.ओ. कार्यलयात थुंकण्यास मनाई करणाऱ्या  आरटीओ लिपिकाला एका एजंटने मारहाण केल्याची घटना कल्याण आरटीओ कार्यलयात काल  सायंकाळच्या सुमारास  घडली होती. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनंतर खडकपाडा पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला. आज कल्याण आरटीओ मध्ये कर्मचाऱ्यांनी मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत लेखणी बंद आंदोलन केलं. यावेळी घोषणाबाजी करत कर्मचाऱ्यांनी या मारहाणीच्या  घटनेचा निषेध नोंदवला. मारहाण करणाऱ्या विरोधात कलम ३५३ अन्वये गुन्हा दाखल करत मारहाण करणाऱ्या विरोधात कठोर कारवाई करा अशी मागणी केली.


आरटीओ कार्यालय परिसरात थुंकण्यास मज्जाव केला म्हणून आरटीओ एजंट मच्छिंद्र केणे याने लिपिक मनिष जाधवला मारहाण केल्याचा प्रकार काल संध्याकाळी घडला. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात अदखलपात्र  गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ आज कल्याण आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी  लेखणी बंद आंदोलन केलं. यावेळी आरटीओ कर्मचारी संघटनेच्या पदाधिकारी आणि सदस्यांनी एकत्र येत घोषणाबाजी करत या घटनेचा निषेध नोंदवला. 


 दरम्यान आरटीओ कार्यलयात एजंट कडून होणारी जनतेची लुट थांबविण्यासाठी आणि पारदर्शकता येण्यासाठी  सरकारने अनेक सुविधा या ऑनलाईन पद्धतीने सुरु केल्या आहेत. असे असले तरीही आरटीओ कार्यलय परिसर आजही एजंटच्या सुळसुळाटाने गजबजलेले दिसते. तसेच त्यांच्या टपऱ्यांनी आरटीओ कार्यलयाला वेढा घातला आहे. त्यामुळे अधिकाऱ्यांच्या संगनमताने काम करणाऱ्या या एजंटनेच आरटीओ कर्मचाऱ्यांला मारहाण केल्यानंतर आतातरी प्रशासनाचे डोळे उघडणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.

Post a Comment

0 Comments